वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानानंतर काही दिवसांनी मतदान टक्केवारीत झालेली वाढ तसेच मतदानाच्या दिवशी झालेला गैरप्रकार आणि समाज माध्यमांवर प्रसारित केले जाणारे मतदानाचे अंदाज यावरून मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समनक जनता पार्टीने यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत ५.८७ टक्के मतदान वाढीच्या अंदाजाचे वृत्त विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले होते. मतदान झाल्यानंतर काही दिवसांनी मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ दर्शवण्यात आली. ही वाढ कशी काय होऊ शकते, असा प्रश्न तक्रारीतून करण्यात आला आहे.
हेही वाचा : मातृदिनीच माऊलीवर कोसळला दुःखाचा डोंगर…तीन वर्षीय चिमुकल्याचा डोळयासमोर…
मतदानाच्या दिवशी २६ एप्रिल रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कळंब चौक येथील अंजुमन शाळेच्या मागील भागात बोटाला शाही लावून पैसे वाटत असल्यावरून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व प्रकार पाहता मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदारांची दिशाभूल करणारा विजयी उमेदवारांबाबतचा अंदाज समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे. या अंदाजाला कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे तसेच आधार नाही. मग उमेदवाराच्या विजयाचे भाकीत कसे काय वर्तवले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करीत समनक जनता पार्टीने यावर आक्षेप घेतला असून वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.