लोकसत्ता टीम
वाशीम: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समता परिषदेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे.
हेही वाचा… मंदिरामध्ये वस्त्र संहिता: सर्व मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी विहिंपचा पुढाकार
एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा… गोरेवाड्यातील ‘ते’ अनाथ बछडे आईच्या प्रतीक्षेत आजारी
या निवेदनावर समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे, सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव राऊत, मालेगाव तालुका अध्यक्ष कपिल भालेराव , विठ्ठलराव ढगे, विलास ढगे मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख जावेद भवानीवाले बालाजी ठेंगडे, निलेश काळे, संजय इंगोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.