वाशिम : भाजप प्रचार करतेय की, काँग्रेसने देशाला लुटले. आणि कालच सुप्रीम कोर्टाने दणका देताच भारतीय स्टेट बँकेने कर्ज रोख्याची माहिती निवडणुक आयोगाकडे सादर केली. चार ते पाच वर्षात म्हणजेच निवडणुक रोख्याची योजना सुरु होती. त्याकाळात भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. मग तुम्हीच सांगा कुणी कुणाला लुटतेय. हे थापाडे सरकार असून ही ‘भाजप’ नसून ‘भाडोत्री जनता पार्टी’ आहे. त्यांच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके आहेत.असा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.
कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी मंत्री संजय देशमुख, महंत सुनील महाराज, डॉ.सुधीर कवर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उध्दव ठाकरे म्हणाले ” यवतमाळ हा जिल्हा सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान स्वतःचा उदोउदो येथे करण्यासाठी येतात. मात्र शेतकऱ्यांना कुठलीच मदत होत नाही, परंतु त्यांच्या सभेसाठी १२ कोटी रुपये खर्च होतात. तर मिंधे सरकार जाहिरातीवर ८५ कोटी रुपये खर्च करतात. यांना जनतेचा कुठलाच कळवळा नाही.”
ठाकरे यांनी शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले आता मै मेरी झांसी नही दुंगी अस कुणीतरी म्हणतयं, पण ही झांशी कुणाची आहे. समृध्दी महामार्गाच काम कुणी रोखलं होतं. ? खासदार भावना गवळी यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे ठाकरे म्हणाले तसेच बंजारा समाजाची फसवणूक करुन साडे सातशे कोटीचा भुखंड स्वतःच्या घशात घालणाऱ्याला धडा शिकवा, असा आरोप पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर केला. मोदी सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ नये, म्हणून रस्त्यात तारेचे खिळे उभे केले, अश्रुधूर सोडले, रबरी गोळीबार केला. दिल्लीला येण्यापासून रोखले आता त्यांना दिल्ली येण्यापासून रोखा, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.
सरकारची हमीभाव योजना फसवी
सरकारने शेतकऱ्यांना मोठ मोठया घोषणा देत हमीभाव योजना सुरु केली. कमी भावात माल खरेदी केल्यास गुन्हे दाखल करु, असे आश्वासन दिले. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेतले. आता कुणावर गुन्हे दाखल करणार असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा; काय आहे अजेंडा जाणून घ्या
आधी चाय पे चर्चा आता साध पाणीही मिळत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्हयातील दाभडीत येऊन चाय पे चर्चा करतात. आश्वासने देतात. मात्र दहा वर्षानंतरही काहीच देत नाहीत. आधी चाय पे चर्चा होते. आता साधं पाणीही मिळत नसल्याचे ठाकरे म्हणाले.