नागपूर: राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असून काही भागात दिवसा ऊन तर पहाटे आणि रात्री थंडी पडत आहे. एवढेच नाही तर ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने नोंदवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशपातळीवरही हे बदल होत आहे. तामीळनाडूत अतिवृष्टी तर कर्नाटक आणि गोव्यावरही पावसाचे सावट असल्यामुळे हिवाळ्यात थंडीची नाही तर पावसाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आणि काही ठिकाणी वातावरण कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… भाजपने हिम्मत असेलर महापालिका निवडणुका घ्यावी- अनिल देशमुख यांचे आव्हान
राज्यातील अनेक शहरांमध्ये ऊन आणि थंडी असे दोन्हीही वातावरण अनुभवायला मिळत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. महाराष्ट्रासह राजस्थान आणि पंजाबमध्येही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर दहा नोव्हेंबरपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात मुसळधार पाऊस होणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडू आणि कराईकलमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान आणि पंजाबमध्येही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पाऊस होऊ शकतो. देशात वाढत्या थंडी सोबतच हवेची गुणवत्ता देखील खराब होत आहे. धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे, नागपूर व दिल्लीसह देशात अनेक शहरांत प्रदूषण वाढले आहे.