यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध अपघातात सात जण ठार झाले. मृतांमध्ये एमबीबीएस अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवार जिल्ह्यासाठी अपघातवार ठरले. पांढरकवडा येथे भरधाव दुचाकी टोलनाक्यावर उभ्या ट्रकवर जाऊन धडकल्याने एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री घडला. कोगिल्ला डेव्हिडराज प्रेमदास (२१.रा. परकाल मंडल, वरंगल तेलंगणा) व बालासाई चीप्पेला (२१, रा. विजयवाडा) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही आदिलाबाद येथील आरआयएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी रविवारी रात्री तीन दुचाकीने पांढरकवडावरून आदिलाबादकडे जात होते. रात्री १२ वाजताच्या सुमारास पांढरकवडा टोल नाक्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयसिंग राठोड, श्यामा प्रसाद व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी घटनास्थळी पोहचले. अपघाताचे वृत्त समजताच आदिलाबादचे आमदार पायल शंकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पांढरकवडा येथे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला भंगार विक्रीतून ४९.२० कोटींची कमाई

दुसऱ्या घटनेत सावळी सदोबा परिसरातील आयता हेटी येथे दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिल मारुती आडे (३५), असे मृताचे नाव आहे. तो सावळी सदोबावरून आयता (हेटी) येथे जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात अनिल गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्याला यवतमाळ येथे हलविले, तेथून नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : नवे पाहुणे येणार! नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा तीन वाघ सोडण्याचे नियोजन

विडूळ येथेही दुचाकी अपघात झाला. तीन तरुण शेंबाळपिपरी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परतत असताना दहागाव फाट्याजवळ दुचाकी उसाच्या ट्रॉलीला जाऊन धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ओंकार गंगाधर हुंबे (२३, रा. विडूळ) असे मृताचे नाव आहे. तर वैभव रामकृष्ण वाळूककर (२३) आणि संकेत महेंद्र अक्कावार (२३) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेजण शेंबाळपिंपरी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी रविवारी गेले होते. गावाकडे परतताना रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या उसाच्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीने जोराची धडक दिली.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अजित पवारांचेही नागपुरात कार्यालय

पुसद शहरातील दिग्रस रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात अविनाश मारोतराव डोंगरे (४७) रा. गायमुखनगर हे जागीच ठार झाले. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी दुचाकी (क्रमांक एमएच २९ सीए २१३१) चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला. नागपूर-यवतमाळ महामार्गावर कळंब नजीक हायटेक धाब्याजवळ भरधाव कार उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. तुषार पांडुरंग कामठे (३६) आणि विश्वजित भारत कैरेशी (२१, दोघेही रा. वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. कार (क्रमांक एमएच०१, वायए ३६८०) ही यवतमाळहुन वर्धेकडे जात होती. कळंबनजीक हायटेक धाब्याजवळ नियमबाह्य पद्धतीने उभ्या असलेल्या ट्रक (क्र. सीजी०८-एयु ९१०१) वर भरधाव कार मागून आदळली. यात कारमधील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. यवतमाळ- नागपूर मार्गावर अनेक धाब्याजवळ ट्रक व इतर वाहने वाहतूक नियम न पाळता उभे असतात. त्यामुळे अपघात होत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal 7 died in 5 accidents at various places in the last 24 hours nrp 78 css