यवतमाळ : संसार हा प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सोबतीवर उभा असतो. पण कधी कधी या नाजूक नात्यांमध्ये निर्माण झालेली दरी एका व्यक्तीला एवढी असहाय्य करून सोडते की, तो मृत्यू हाच शेवटचा पर्याय निवडतो. अशीच एक हृदयद्रावक घटना घाटंजीत घडली. माहेरी निघून गेलेली पत्नी मुलांसोबत बोलू देत नसल्याने खचलेल्या पतीने मुलांच्या पाळण्याच्या दोरीनेच गळफास घेत आत्महत्या केली. संदीप वसंता आडे (२८), रा. घाटी, गुरुदेव वार्ड क्रमांक चार, घाटंजी येथे घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
संदीप आडे हा एक कुटुंबाचा आधारवड होता. लग्नानंतर त्याच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. मात्र पती – पत्नीत काही कारणाने बेबनाव झाला. या वादामुळे पत्नी १५ दिवसांपूर्वी मुलगा सक्षम (७) आणि मुलगी भार्गवी (३) यांना घेवून माहेरी जोगीनकवडा (ता. पांढरकवडा) येथे निघून गेली. पत्नी घर सोडून गेल्याने संदीप अस्वस्थ झाला.
घरात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात रमलेला होता. पण संदीपच्या मनात एकाकीपणाची एक वेगळीच घालमेल सुरू होती. पत्नी गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांना घेऊन माहेरी गेल्यानंतर तीने त्याच्याशी संपर्कच तोडला होता. घरात माणसं होती, पण तरीही त्याला मुलांचा जिवाभावाचा सहवास मिळत नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. मनातल्या वेदना व्यक्त करण्यासाठी त्याला आधार हवा होता, पण तो सापडला नाही.
पत्नीने त्याचे मुलांशीही बोलणे बंद केले. पत्नी मुलांशी फोनवरही बोलू देत नसल्याची खंत त्याने मोठ्या भावाला बोलून दाखवली. भावाने त्याची समजूत काढून काही प्रतिष्ठीत मंडळींना बसवून सामोपचाराने वाद मिटवू आणि पत्नी व मुलांना घेवून येवू, असे सांगितले. मात्र, कौटुंबिक वादात मुलांपासून तुटल्याने संदीप सैरभैर झाला. त्याने संतापाच्या भरात मंगळवारी मध्यरात्री पाळण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
पहाटे संदीपच्या आईने जेव्हा खोलीत डोकावले, तेव्हा समोर दिसलेले दृश्य काळीज चिरत जाणारे होते. पाळण्याची दोरी, जी कधी त्याच्या लहान मुलांना झोके देत असे, तीच आज त्याच्या गळ्याचा फास बनली होती. या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, चिमुकले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंब हतबल झाले आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ इंदल आडे याने घाटंजी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.