यवतमाळ : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर पाटणबोरी व पिंपळखुटी आदी गावात चालत असलेल्या सोशल क्लबमधील जुगार अड्ड्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने कारवाईचा फार्स सुरू केला. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांनी पिंपळखुटी येथील एका ‘सोशल क्लब’वर छापा टाकल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, नंतर या कारवाईस ‘नियमित तपासणी’चा मुलामा देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पाटणबोरी व पिंपळखुटी ही गावे आंतरराज्य जुगाराचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. या गावात जुगार लागेल या लालसेने आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूसह यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागातून जुगारप्रेमी येतात. गावात ‘सोशल क्ल्ब’च्या नावाखाली उघडलेल्या ‘इनडोअर क्लब’मध्ये २४ तास जुगार सुरू असतो. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित करून पोलीस व महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर कारवाईचा फास आवळला, मात्र ही लुटपुटीची कारवाई ठरली. कालांतराने सर्व सुरळीत झाले, असे चित्र असताना रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांनी पिंपळखुटी येथील एका अण्णाच्या बहुचर्चित ‘सोशल क्लब’वर छापा टाकला. निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, अनेक कर्मचारी या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती आहे. या कारवाईवेळी कथित ‘सोशल क्लब’मध्ये जुगाराचे चार टेबल सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. जुगाराच्या एका टेबलवर लाखोंची उलाढाल होते, हे विशेष. या कारवाई वेळी अनेक ग्राहक क्लबमध्ये होते. मात्र, कारवाईनंतरची सर्व प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्याने पोलीस वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे. छापा टाकूनही पंचनामा ‘नील’ दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कारवाई करून कोणाला बक्षिसी मिळवायची होती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. ‘सोशल क्लब’मधील रविवारी रात्रीचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासल्यास अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक याबाबत काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मुसळधार पावसाने गडचिरोलीत हाहाकार, तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४१ मार्ग बंद
‘ती’ नियमित तपासणी
या कारवाई संदर्भात ‘लोकसत्ता’ने पांढरकवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश झांबरे यांना विचारणा केली असता, रविवारी अशी कोणतीच कारवाई पिंपळखुटी किंवा इतर ठिकाणी झाली नाही, असे सांगितले. अधिक खोलात जावून विचारले असता त्या ‘सोशल क्लब’वर रविवारी नियमित तपासणी करण्यात आली. ती कारवाई नव्हती. हा कामाचा भाग आहे. तेथे गैर काहीही आढळले नाही, अशी पुष्टी जोडली. ‘सोशल क्लब’ची नियमित तपासणी करताना महसूल विभागाचे पथक सोबत असणे अपेक्षित असते. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली असावी म्हणून, पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांना विचारणा केली असता, या तपासणी संदर्भात महसूल विभागाला कुठलीही कल्पना नव्हती. पोलिसांना काही माहिती मिळाली असल्याने त्यांनी तपासणी केली असावी, अशी प्रतिक्रिया गाडे यांनी दिली.