यवतमाळ : शेतात वास्तव्यास असलेल्या संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरावर काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. घरातील महिलांवर शस्त्रांचे वार करीत दरोडेखोरांनी घरातील किमान ३० लाख रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना महागाव तालुक्यातील चिल्ली (इजरा) या गावापासून किमान तीन किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम गोकुळवाडी येथे घडली.
आज रविवारी दुपारी उशिरा ही घटना पंचक्रोशीत माहीत झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पांडे कुटुंब हे चिल्ली येथील जुने इजारदार आहेत. पांडे कुटुंबाकडे चिल्ली (इजारा) परिसरात किमान ५०० एकर शेत जमीन होती. चिल्ली (इजारा) गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात गोकुळवाडी येथे संतोष कुमार मनोहर पांडे हे शेतात जुन्या वाड्यासारखे घर बांधून वास्तव्यास आहेत. संतोष कुमार पांडे यांच्या सोबत त्यांची बहीण कु. कृष्णा मनोहर पांडे (३५) आणि सौ. सविता सुभाष तिवारी (४९) रा. नागपूर, ह्या काल रात्री घरात मुक्कामी होत्या. काल मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास ६ अज्ञात लुटारुंनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. शस्त्राच्या धाकावर या लुटारूंनी घरातील रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी महिलांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी महिलांना लाकडी राफ्टर व शस्त्राचे वार करून मारहाण केली. या मारहाणीत सौ.सविता सुभाष तिवारी यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून कु. कृष्णा पांडे ह्या सुद्धा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी घराची झाडाझडती घेत ३० लाखावर रोख रक्कम आणि १७० ग्राम सोन्यांचे दागिने असा ३८ लाख ५० हजाराचा ऐवज लुटून नेला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस सायंकाळी घटनास्थळी पोहचले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा : अजित पवारांची अवस्था “धरलं तर चावते..” अशी, वडेट्टीवार यांची टीका
सशस्त्र दरोड्याच्या घटनेत महिलांना गंभीर मारहाण करून जवळपास ४० लाखाचा मुद्देमाल लुटून नेल्याच्या खळबळजनक घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, ठाणेदार सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दरोडेखोरांनी पाणी पिऊन पाण्याच्या बॉटल फेकून दिल्या. त्यावर त्यांच्या बोटाचे ठसे उमटले असून, त्या आधारे दरोडेखोरांपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी व्यक्त केला. महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, मार्गदर्शक संजय भगत, गजानन वाघमारे, अमोल राजवाडे, नंदकुमार कवळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची भेट घेऊन माहिती विचारली असता त्यांनी या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली व लवकरच गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.
दरोड्याच्या घटनेची १२ तासानंतर पोलिसांना खबर
चिल्ली (इजारा) गावापासून तीन किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेतात रात्री साडेअकरा वाजता दरोडेखोरांनी संतोष कुमार पांडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकला. या गंभीर गुन्ह्याची खबर महागाव पोलिसांना तब्बल १२ तासानंतर, म्हणजे आज रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लागली. संतोष कुमार पांडे यांनी ११२ नंबर डायल करून घटनेची सूचना पोलिसांना दिली. हा फोन बिटरगाव पोलिसांना लागला. घटनास्थळ महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने त्यांनी ही घटना महागाव पोलिसांना कळविली. परंतु, गोकुळवाडी हे गाव नेमके कोठे आहे याचा थांगपत्ता महागाव पोलिसांना लागत नव्हता. दरोडा पडल्याचे ठिकाण शोधायला पोलिसांना १२ तास लागले.
हेही वाचा : बुलढाण्याला केंद्रात तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’!प्रतापराव जाधव यांची मंत्रीपदी वर्णी
गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न
चिल्ली इजारा येथील पांडे घराण्यातील संतोष कुमार पांडे यांच्याकडे किमान दीडशे एकर शेत जमीन असल्याचे कळते. त्यांनी मागील महिनाभरात आपला शेकडो क्विंटल कापूस फुलसांगी बाजारपेठेत विकला. रात्री दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर संतोष कुमार पांडे यांच्या घरातून किमान ८५ लाखाची रोख रक्कम व ४० तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची चर्चा आहे. परंतु, गुन्हयाचे गांभीर्य कमी करण्यासाठी पोलिसांनी ३० लाख रुपये रक्कम व १७० ग्राम सोने एवढाच मुद्देमाल तक्रारीत नोंदवून घेतल्याची चर्चा आहे.