यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा चित्ररथ राहणार आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील पाटणबोरी (ता. पांढरकवडा) येथील तरुणांनी केवळ दहा दिवसांमध्ये या चित्ररथातील शिल्प पाटणबोरी या गावात साकारले.
या चित्ररथाची पहिली झलक आज मंगळवारी कर्तव्यपथावरील (दिल्ली) तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली. चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये एकूण ३० कलावंतांचा सहभाग असून यात यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे. हा चित्ररथ साकारताना तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी) हे शिल्पकला विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या समुहामध्ये भूषण हजारे (कळंब), सूरज गाऊत्रे (सोनबर्डी, ता. केळापूर), पिंटू भोंग (पहापळ, ता. केळापूर), नितेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दूर्षेट्टीवर, अरुण मेश्राम, सुमीत कानके (सर्व रा. पाटणबोरी) आदी शिल्पकारांचा समावेश आहे. श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट, जि. वर्धा) हे हस्तकला विभागाचे प्रमुख आहेत.
हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक
जिल्ह्यातील कलावंतांनी तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. १५ जानेवारीला दिल्लीमध्ये हे शिल्प पोहोचले असून उर्वरीत काम दिल्लीत पार पडले. आज नृत्य, संगीत व पोशाखासह कर्तव्यपथावर तालीम पार पडली. या माध्यमातून जिल्ह्यातील कलावंतांनी साकारलेल्या चित्ररथाची पहिली झलक संपूर्ण देशाला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह छत्तीसगड राज्याचा (बस्तरचा मुरिया दरबार) चित्ररथ साकारण्याची जबाबदारी देखील याच कलावंतांना मिळाली आहे. या चित्ररथाद्वारे, महाराष्ट्रातर्फे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक
जिल्ह्यासाठी अधिक अभिमानाची बाब म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समुहामध्ये जिल्ह्यातील या कलावंतांचा समावेश कायम आहे. मागील कलावंतांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तिपीठ’ संकल्पनेवर आधारित चित्ररथासह उत्तरप्रदेश राज्यांचा ‘अयोध्येतील दीपोत्सव’ संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्याची जबाबदारी आली होती. जिल्ह्यातील या कलावंतांनी ती जबाबदारी लिलया पेलत महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक प्राप्त करून दिले होते.
हेही वाचा : गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्या; चामोर्शी तालुक्यातील घटना, महिलांचा शोध सुरू
शिवरायांची लोकशाही प्रतिबिंबित
भारताचा विकास, लोकशाही या विषयांना अनुसरून असलेल्या चित्ररथांचा समावेश यंदाच्या पथसंचलनामध्ये असणार आहे. ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह मॉ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळाले. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज, कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य दिसले. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात दिसून येत आहेत.