यवतमाळ : आईच्या ममतेची हजारो उदाहरणे आपल्या आसपास सापडतात. मात्र नवजात बाळाला जन्म झाल्यानंतर अवघ्या तासाभरात ‘माता न तू वैरिणी’, याचा प्रत्यय येत असेल तर अशा आईला आई तरी कसे म्हणावे, असा प्रश्न उपस्थित करणारा संतापजनक प्रकार पुसदमध्ये समोर आला आहे. हृदय पिळवटून टाकणा-या या घटनेने जनमानस हादरले आहे.
अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला नालीत फेकून देण्यात आल्याची घटना रविवारी पुसद येथील बीएसएनएल कार्यालयामागील एका कोचिंग क्लासजवळ उजेडात आली. पुसदमध्ये रविवारी रात्री अचानक वादळी पाऊस झाला. या दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फायदा घेत एका अनोळखी महिलेने तासाभरापूर्वी जन्म घेतलेल्या पोटच्या गोळ्याला बीएसएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका कोचिंग क्लासजवळील रस्त्याच्या नालीत फेकून दिले. मात्र त्या बाळाचे दैव बलवत्तर होते. त्याच्या रडण्याचा आवाज काही नागरिकांनी ऐकला आणि त्या मातेचे बिंग फुटले.
हेही वाचा : हिट अँड रन… नागपुरातील रामझुला अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत; आरोपी महिलेला जामीन मिळणार की…
या घटनेची माहिती नागरिकांनी पुसद शहर पोलिसांना दिली. ठाणेदार उमेश बेसरकर यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळ गाठून चिखलात फेकलेल्या नवजात बाळाला पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. अविनाश जाधव, डॉ. आशिष कदम, डॉ. उमाशंकर अवस्थी आदींनी बाळावर तातडीने प्राथमिक उपचार केले. हे बाळ हे पुरुष जातीचे असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या बाळाला १०८ रुग्णवाहिकेद्धारे यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा : ‘नून सफारी’! ताडोबात वाघापेक्षा महसुलाचीच चिंता अधिक…
१०८ रुग्णवाहिकेचे डॉ. उमाशंकर अवस्थी, चालक गणेश काईट, परिचारिका सविता कपाटे, पल्लवी ताटेवार, पोलीस शिपाई अनिल गारवे आदींनी बाळाला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुखरूप पोहोचविले. तातडीने मदत मिळाल्याने आता हे बाळ सुखरूप असून त्याची रवानगी माता- बाल संगोपन केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचा संशय व्यक्त होत असून पोटच्या गोळ्याला नालीत फेकणाऱ्या आई व वडिलांबद्दल सर्व स्तरातून निषेध व संताप व्यक्त होत आहे.