यवतमाळ : वासनांध तरुणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोमवारी वणी येथे घडली. तरुणांनी केलेल्या या कृत्यामुळे मुलगी चांगलीच घाबरली असून तिला मानसिक धक्का बसला. तरुणांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीने शेवटी स्वतःला सावरत पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली. पोलिसांसमोर तिने आपबिती कथन केली. तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासांतच आरोपींना गजाआड केले. त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर उर्फ राकेश नामदेव भोस्कर (२४), राहुल राकेश यादव (२५) आणि शंकर यादव (२८) तिघेही रा. राजूर (कॉ.) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा : “निर्लज्जम सदा सुखी… गद्दार तर गद्दारच राहतो”, अरविंद सावंत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथील तीन तरुणांनी एका चायनिजच्या दुकानावर काम करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री ऑटोतून अपहरण केले. त्यानंतर तिला वणी ते घुग्गुस मार्गावरील निर्जनस्थळी आणले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर परत तिला टिळक चौकात सोडून दिले. तरुणांच्या या कृत्याने मुलगी चांगलीच धास्तावली. तिला काहीही सुचेनासे झाले. शेवटी मानसिक धक्क्यातून स्वतःला सावरत तिने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोर आपबिती कथन केली. अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध रितसर तक्रार नोंदविली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींना अटक केली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवून पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीनही नराधमांना गजाआड केले. त्या तीनही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३६६, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहे. या अत्याचार प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.

हेही वाचा : यवतमाळसाठी स्वत:च्या उमेदवारीचा ठासून दावा…..महाविकास आघाडीत चर्चेआधीच….

लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीचे शारीरिक शोषण

घराशेजारी राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत ७ ते ८ महिने शारीरिक शोषण केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध तरुणीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १९ जूनला सायंकाळी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी करीत आहे.