यवतमाळ : नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंब तालुक्यातील चापर्डानजिक सोमवारी पहाटे भरधाव कार ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाचही जण ठार झाले होते. यातील तिघेजण पंजाबचे रहिवासी होते, तर दोघे जन कॅनडातील रहिवासी होते. अपघातातील पाचही मृतांचे शव विच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सर्व मृतदेह त्यांच्या गावी विमानाने रवाना करण्यात आले. कॅनडातून भारतात अस्थी विसर्जनासाठी आलेल्या माय- लेकाचा मृतदेह विमानाने कॅनडाकडे रवाना करण्यात आला.

जसप्रित सिंग करनेल सिंग नहल (४०) हा आपली आई बलबीर कौर करनेल सिंग नहल (७४, दोघेही रा. रूबी कोर्ट व्हिक्टोरिया, ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा) तर भजन कौर चूर सिंग (७१), तरजिंदर सिंग परविंदर सिंग (२१, दोघेही रा. झिंगडा, जि. शहीद भगतसिंग नगर, राज्य पंजाब) अशी मृत आजी-नातवाची नावे आहे आणि जसविंदर सिंग अजीत राम (४२) रा. हेरीया जि. शहीद भगतसिंग नगर, राज्य पंजाब असे मृत चालकाचे नाव आहे.

हेही वाचा : हिट अँड रन प्रकरण: आरोपी रितू मालूला अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जामीन, पोलीस कुठे कमी पडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रूबी कोर्ट व्हिक्टोरिया, ब्रिटीश कोलंबिया कॅनडा येथील जसप्रित सिंग कर्नल सिंग नहल यांच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वी कॅनडामध्ये निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जनाकरीता जसप्रित सिंग आणि त्याची आई बलबीर कौर दोघेही पंजाबमधील किरतपूर येथे २२ जूनला आले होते. अस्थी विसर्जनानंतर २९ जूनला जसप्रित सिंग आणि त्याची आई बलबीर कौर, पंजाबमधील मावशी भजन कौर चूर सिंग आणि जसप्रित सिंग यांचा पुतण्या तरजिंदर सिंग परविंदर सिंग हे चौघेही नांदेडकडे दर्शनासाठी चालक जसविंदर सिंग अजीत राम यांच्यासह इनोव्हा कार (क्र. पीबी-११ बी-४९६३) ने निघाले होते.

सोमवार, १ जुलैच्या पहाटे त्यांच्या कारने कळंब-यवतमाळ मार्गावरील चापर्डाजवळ रेती घेवून जाणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात कॅनडा येथील मायलेकांसह पंजाबमधील तिघांचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती पंजाबमधील असल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. सर्वांचे मृतदेह यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवागारात ठेवण्यात आले. पंजाबमध्ये मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर मंगळवारी दुपारी सर्व मृतांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीने सर्व मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्याचे नियोजन केले. मंगळवारी सायंकाळी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावरून तीन मृतदेह पंजाब, तर दोन मृतदेह कॅनडाच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी कळंब ठाणेदार दिपमाला भेंडे यांच्यासह शीख समाजबांधव उपस्थित होते. वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या मुलासह त्याची आई, मावशी, भाऊ व चालकावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची माहितीअभावी धडपड सुरूच; वाशीम जिल्ह्यात उत्पन्न दाखल्यासाठी महिलांची पुन्हा गर्दी

या कुटुंबीयास नांदेडकडे घेवून जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी पहाटे अपघात घडला. यामध्ये वाहनामधील चौघांसह चालकाचाही मृत्यू झाला. या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक जसविंदर सिंग अजीत राम (४२) रा. हेरीया जि. शहीद भगतसिंग नगर, राज्य पंजाब याच्याविरोधात कलम २८१, १०६ (१) नुसार गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहे.