यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गांजा शेतीकडे वळत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महागाव तालुक्यात गांजा शेती आढळून आली होती. त्यानंतर आता राळेगाव तालुक्यातील गोपालनगर येथेही गांजा शेतीचा प्रयोग उघडकीस आला. कापूस, तूर पिकांत गांजा शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका जणाला अटक केली आहे. शंकर गणपत कारे (काळे) (६०, रा. गोपालनगर), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सुरू झालेली ही कारवाई रविवारच्या सायंकाळपर्यंत सलग २४ तास चालली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंमली पदार्थाचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘नशामुक्त पहाट’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कुठेही अंमली पदार्थाची लागवड, वाहतूक, विक्री व सेवन होणार नाही. त्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. शेतात तुरीच्या उभ्या पिकांत गांजा झाडाची लागवड आढळून आली. मोजणीत गांजाची ६० झाडे मिळाली. झाडांची पाने, फुले, खोडे, शेंडे यांची मोजणी करण्यात आली. पाने, शेंडे व फुलांचे एकूण वजन १६ किलो ८४० ग्रॅम भरले. त्याची किंमत ८४ हजार रुपये इतकी आहे.

हेही वाचा : झारखंडमधून हरवलेली महिला वर्षभरानंतर सुखरुप घरी पोहोचली; महिला राज्यगृह व स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

हा मुद्देमाल जप्त करून शंकर कारे (काळे) याच्याविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात एनपीडीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, रामकृष्ण जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अमोल मुडे, विवेक देशमुख, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुकरकर, भोजराज करपते, नीलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके, विवेक शेंटे, गणेश हुलके, रुपशे जाधव, सूरज गावंडे आदींनी केली.

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी अकोल्यातील तरुणाची पुण्यात आत्महत्या

विक्री करण्यासाठी लागवड

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या गोपालनगर येथे शेतात गांजा लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यावरून एनपीडीएस कायद्यातील कायदेशीर बाबींची पूर्तता करून पोलीस कर्मचारी शेतशिवारात पोहचले. शेतात शंकर काळे हा शेतकरी आढळला. त्याने सदर शेत त्याचेच असल्याचे सांगितले. त्याने विक्री करण्यासाठी गांजा लागवड केली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal cannabis farming found at ralegaon village farmer arrested by local police nrp 78 css