यवतमाळ : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिवसैनिकांनी गाफील न राहता या निवडणुकीत राज्यात सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवावे आणि या निवडणुकीच्या यशासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्थानिक पोस्टल मैदान येथे आभार यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमूख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, शीतल संजय राठोड, जीवन पाटील, पराग पिंगळे, विशाल गणात्रा आदी उपस्थित होते.

एकनाथ शिदे म्हणाले, राज्यात सर्व सामान्य जनता, शेतकरी, महिला, तरुण हेच विकासाचे केंद्रबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी महायुती सरकारची लोकाभिमुख आणि गतिमान वाटचाल सुरू आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी, लाडकी बहीण आणि अन्य योजना भविष्यात कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील पाच कोटी लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमातून विविध योजनांचा लाभ मिळाला. लाडक्या बहिणी लखपती दीदी व्हाव्यात यासाठी त्यांच्याकरीता रोजगार, उद्योगाच्या नवीन योजना लवकरच सुरू करण्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

विदर्भाच्या विकासासाठी महायुती सरकार कायम प्रयत्नशील आहे. येथील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसाचा हमीभाव देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते, जनता हीच आपली ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. आता उपमुख्यमंत्री असलो तरी कामाचा झपाटा सर्वसामान्यांप्रती समर्पित वृत्तीनेच सुरू आहे, भविष्यातही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठीच कार्यरत राहील, असे शिंदे म्हणाले.

‘कोण गद्दार, कोण खुद्दार’ याचा निर्णय जनतेने विधानसभा निवडणुकीत केला आहे. सध्या विरोधी पक्षाची अवस्था ‘ ना शेंडा ना बुड ‘ अशी झाल्याची टीका त्यांनी केली. वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात मतदान करून कोण गद्दार आहे, याची प्रचिती ‘त्या’ शिवसेनेने दिली, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची गंगा आणली. सर्व जाती, धर्मांना घेवून सर्व समावेशक आणि समान विकास केला, असे सांगितले. प्रास्ताविक भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी, एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी कायम भरभरून मदत करून निधी दिला, असे सांगितले. त्यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णय लोकाभिमुख ठरले, असे ते म्हणाले.

राज्य शासनाने महामंडळाची घोषणा केलेल्या विविध समाजाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. शिवसेनेच्या वतीने सुताचा हार घालून आणि चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा शेला स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमास जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.