यवतमाळ : भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षात गटा-तटाला स्थान नाही, असे सांगितले जाते. मात्र पक्षाच्या या तत्वाला यवतमाळात बाधा झाल्याचे चित्र अलिकडे दिसत आहे. याची प्रचिती रविवारी येथे आयोजित आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या सत्कार सोहळ्यात भाजप कार्यकर्त्यांना आली. भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार येरावार गट उपस्थित नसल्याने विविध चर्चा रंगली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. पक्षात दोन गट असल्याची चर्चा नेहमीच असते. एक गट माजी आमदार मदन येरावार यांच्या बाजूने तर दुसरा गट माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा असल्याचे सांगितले जाते. हे गट एकमेकांच्या कार्यक्रमात उपस्थित राहत नसल्याची प्रचितीही वारंवार येते. रविवारी भाजपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि महादेव सुपारे यांनी मंत्री अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार किसन वानखेडे यांच्या सत्काराचे आयोजन येथील पोस्टल मैदानात केले होते. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या प्रत्येक मोठ्या नेत्यास, पदाधिकाऱ्यास बोलाविण्यात आले होते. सोहळ्याचे आयोजक माजी मंत्री हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार, जिल्हा समन्वयक नितीन भूतडा असल्याचे माध्यमांनाही कळविले होते. सोहळ्यापूर्वी नवनिर्वाचित मंत्री अशोक उईके यांची स्वागत रॅली शहरात काढण्यात आली. प्रत्यक्ष कार्यक्रमात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदरकुरवार, माजी आमदार उत्तमराव इंगळे व पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार मदन येरावार, समन्वयक नितीन भूतडा, नवनिर्वाचित आमदार किसन वानखेडे हे या सत्कार सोहळ्याकडे फिरकलेसुद्धा नाही. कार्यक्रमाला प्रमुख नेत्यांची गैरहजेरी सोहळ्यात चर्चेत होती.

हेही वाचा : नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…

जिल्ह्यात माजी आमदार मदन येरावार यांचा गट प्रबळ मानला जातो. विधानसभा निवडणुकीत मदन येरावार यांचा पराभव झाल्याने जिल्ह्यातील भाजपचे राजकीय सत्ताकेंद्र कोणाकडे राहील, अशा चर्चा पक्षात सुरू झाली. रविवारच्या सोहळ्याने हे केंद्र बदलण्याचे संकेत तर दिले नाही ना, अशीही चर्चा आता रंगत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा हा जिल्हास्तरीय पहिलाच मोठा कार्यक्रम होता. या निमित्ताने भाजपला एकजूट दाखवून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बळ दाखविण्याची संधी होती. मात्र एक गट या कार्यक्रमापासून अलिप्त राहिल्याने पक्ष एकसंध नसल्याची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमास गैरहजर असलेले नेते व पदाधिकाऱ्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आले नसल्याचे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal dispute within bjp minister ashok uike and former mla madan yerawar supporters nrp 78 css