यवतमाळ : राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण जुळल्यानंतर ही शिवसेनेची पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा विश्वास शिवसेना (उबाठा)चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते आज मंगळवारी दुपारी उमरखेड येथे आयोजित सभेत बोलत होते. हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघात सोमवारपासून उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आज उमरखेड येथे आयोजित जनसंवाद सभेस संबोधित केले. यावेळी खा. संजय राऊत यांच्यासह शिवसेना उबाठा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण कसे अस्तित्वात आले, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. मात्र या समीकरणानंतर शिवसेनेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मूळ शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून ही निवडणूक कशी जिंकून दाखवू शकतो, यासाठी ही निवडणूक शिवसेनेसाठी महत्वाची आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. आपण राज्यात अडीच वर्षे उत्तम सरकार चालवून दाखविले. अगदी कोरोना काळात देशातील सर्वोत्तम काम करणारा मुख्यमंत्री म्हणून आपला गौरव झाला. मात्र हा गौरव येथील जनतेचा होता. नागरिकांनी साथ दिल्यामुळे सरकार, प्रशासन उत्तम चालवू शकलो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : बिबट्याच्या पिल्लांनाही आवडला उसाचा मळा, शेवटी मादी बिबट त्यांना येऊन घेऊन गेली
उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. येथील खासदार काय होते, हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेने त्यांना सर्वकाही दिले. आमदार, खासदार केले. आपण मुख्यमंत्री असताना हिंगोली जिल्ह्यात हळद प्रक्रिया प्रकल्पास मंजुरी दिली. मात्र, येथील आमदार, खासदार हळद लावून मिंधेंच्या बोहल्यावर चढले, अशी टीका ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही ठाकरे यांनी हल्लाबोल चढविला. त्यांना महत्वाचे खाते दिले होते. मात्र, काही जणांची भूक कितीही खाल्लं तरी भागत नाही. त्यांना भस्म्यारोग झाला आहे, असे म्हणतात. तर काही जणं अजीर्ण होईपर्यंत खातात. शिवसेनेतून गेलेले काही गद्दार हे भस्म्यारोग झाल्याने गेले, तर काहीजण खावून खावून अर्जीण झाल्याने गेले, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. कितीही संकटे आली तरी शिवसेना सर्व संकटांच्या छाताडावर पाय देवून मार्गक्रमण करणारी संघटना आहे. तळागळातील शिवसैनिक हे या संघटनेचे ऊर्जास्रोत आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे यांची ताकद किती, हे भाजपला आता कळले,” वरुण सरदेसाई असे का म्हणाले? वाचा…
या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ‘भाडोत्री जनता पक्ष’ या शब्दांत टीका करून, भाजपला आपला नेता देशापेक्षा मोठा आहे, असे वाटत असेल तर ते चालणार नाही, असा इशारा दिला. भाजपने गडगंज खाल्लं आहे, त्यांना हे धन लपवायलाही जागा नाही, असे ठाकरे म्हणाले. हिंदुत्ववादी सरकार म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे सरकार नव्हे. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व जपणारे आहे, असे ते म्हणाले. आज भाजपमुळे देशातील हिंदुत्व बदनाम होत आहे. त्यामुळेच देशातील मुस्लीमसुद्धा शिवसेनेकडे येत आहेत, असे ठाकरे म्हणाले. हिंदुत्व हे थापेबाज असूच शकत नाही. भाजपचे हिंदुत्व थापेबाज आहे, अशी टीका त्यांनी केली.