यवतमाळ: केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयात अधिकारी असल्याची बतावणी करून पाच जणांची ४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तोतया अधिकार्यासह अन्य एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. यवतमाळ येथील पुन्हा दोघांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली असून, त्यांना ८६ लाखांनी गंडा घातला आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आता एक कोटी ३३ लाखांच्या घरात गेला आहे.
मास्टरमाईंड तोतया अधिकारी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याला नागपूर कारागृहातून हस्तांतरण प्रकियेत अटक करून आर्थिक गुन्हे शाखेने यवतमाळात आणले. सध्या तो शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडीत आहे. अविनाश पांडे व मकरंद देशकर, अशी नव्याने तक्रार देणार्यांची नावे आहेत. पर्यटन मंत्रालयाच्या योजना असून, त्यात गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होत असल्याचे आमिष दाखविले.
हेही वाचा… यवतमाळ : अल्पवयीन मुलीस पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल
होशिंग व मीरा फडणीस दोघांच्या जाळ्यात सात जण अडकले. प्रारंभी पाच जणांना ४७ लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. सचिन धकाते याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अनिरुद्ध होशिंग याने आपण पर्यटन मंत्रालयात अधिकारी आहोत तर, मीरा फडणीस या महिलेने सदस्य असल्याचा बनाव केला होता. दोघांनी पर्यटन मंत्रालयाच्या अस्तित्वात नसलेल्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त उत्पन्न कमविण्याचे आमीष दाखविले होते.
हेही वाचा… परदेशी शिष्यवृत्तीसाठी मराठा समाजाकडून केवळ ८२ अर्ज; ओबीसींची संख्या अधिक
यवतमाळातील सात जणांचा विश्वास संपादन केला. पैसे दिल्यावर कोणत्याही योजनांबाबत करारपत्र केले नाहीत. पैसे मागितले असता, परतदेखील केले नाहीत. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर सचिन धकाते याने तक्रार दिली. पाच जणांची ४७ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हाही नोंदविण्यात आला. तोतया अधिकारी असलेल्या अनिरुद्ध होशिंग याला नागपूरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारागृहातून ताब्यात घेतले. सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत आहे. अविनाश पांडे यांची ८० लाखाने तर मकरंद देशकर यांची सहा लाख अशी, ८६ लाखांनी दोघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा हा एक कोटी ३३ लाखांच्या घरात गेला आहे. पुन्हा इतर नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल हिरवणकर करीत आहेत.
अन्य जिल्ह्यातही घातला गंडा
आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या अनिरुद्घ होशिंग याने नागपूरसह अन्य जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे सांगितले जाते. आपण केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयात अधिकारी असल्याचे भासवत होता. मंत्र्यांसोबतचे फोटो दाखवून तोतया गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकायला. यवतमाळमध्ये मीरा फडणीस या महिलेलो सोबत घेवून एक कोटी ३३लाखांनी गंडा घातला आहे. पैसे परत मिळतील, असे आश्वासन देऊन टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे सातही जणांनी पोलिसांत तक्रार दिली.