यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नीसह सासू-सासरे, दोन मेव्हण्यांची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील तिरझडा येथील पारधी बेड्यावर मंगळवारी रात्री उशिरा घडली. रेखा गोविंद पवार, पंडित घोसले, ज्ञानेश्वर घोसले व सुनील घोसले अशी मृतांची नावे आहेत. तर गोविंद वीरचंद पवार, असे मारेकरी आरोपीचे नाव आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दारूड्या पतीने मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पत्नीसोबत भांडण केले. या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या जावायाने सबलीच्या सहाय्याने पत्नी रेखा, सासरा पंडित, सासू रूखमा व मेव्हणे ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सबलीचा वार थेट छातीवर करण्यात आल्याने या घटनेत आरोपीची पत्नी रेखा पवार, सासरा पंडित घोसले, मेव्हणा ज्ञानेश्वर घोसले व सुनील घोसले हे जागीच ठार झाले. सासू रूखमा घोसले ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : अमरावती :चारचाकी वाहनाने सहा जणांना चिरडले; तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर
घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आरोपी गोविंद वीरचंद पवार याला ताब्यात घेतले. या घटनेने कळंब तालुक्यात खळबळ उडाली असून तिरझडा येथील पारधी बेड्यावर भीतीचे वातावरण आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.