यवतमाळ : प्रेमाला जात, धर्म, प्रांत, भाषा कशाचेही बंधन नसते. मन जुळले की, प्रेमीजीव सर्व बंधने झुगारून जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार असतात. बहुतेकदा प्रेमात कुटुंबीयच अडथळा ठरते. त्यामुळे एकत्र आलेल्या प्रेमी युगुलाची ताटातूट होण्याचीच शक्यता अधिक असते. चित्रपटात शोभावा असाच प्रसंग यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात घडला आहे.
तालुक्यातील एका तरुणाची धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेत त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. ती उत्तर महाराष्ट्रातून थेट विदर्भात आली. मात्र प्रेम विवाहानंतर नवलाईच्या अवघ्या नऊ दिवसांत नवदाम्पत्याची ताटातूट झाली.
दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील ३२ वर्षीय तरुण गावात धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी निमंत्रण द्यायला नंदुरबार जिल्ह्यात गेला होता. तेथे कथा सांगणाऱ्या एका तरुणीशी त्याचा परिचय झाला. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना भनक लागु न देता ६ मार्च रोजी दारव्हा तालुक्यातील डोलारी येथील जगदंबा मंदिरात प्रेमविवाह केला. अवघ्या नऊ दिवसानंतर या प्रेमविवाहाची माहिती तरुणीच्या नातेवाईकांना मिळाली. १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता तरुणीचे नातेवाईक तरुणाच्या घरात शिरले. प्रेमविवाह केलेल्या मुलीला मारहाण करीत चार चाकी वाहनामध्ये कोंबून घेऊन गेले.
आपण या प्रकरणाची तक्रार देण्याकरिता दिग्रस पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा तक्रार घेण्यासाठी दिग्रस पोलीस टाळाटाळ करीत होते, असा तरुणाचा आरोप आहे. तरुणाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठांनी दिग्रस पोलिसांना तक्रार घेण्यास सांगितले. परंतु पोलिसांनी या घटनेची तक्रार न घेता नवविवाहिता हरविल्याची तक्रार घेतल्याचा आरोप त्या युवकाने केला आहे. आपल्या पत्नीला तिचा भाऊ आणि इतर पाच सहा जण घेऊन गेले. त्यांच्याकडून पत्नीच्या जीवाला धोका असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे दिग्रस पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची फिर्याद घेऊन पत्नीचा शोध घ्यावा, असा अर्ज त्याने दिग्रस पोलिसात दिला. आपली पत्नी हरविली नसून तिला घरात घुसून आपल्या आई वडिलांसमोर मारहाण करीत तिचे कुटुंबीय बळजबरीने घेऊन गेले, असे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.