यवतमाळ : दोन वर्षांपूर्वी उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने दोन वर्षानंतर पिस्टलसह अटक केली. सोमवारी उमरखेड-हदगाव मार्गावर ही कारवाई करण्यात आली. अमजद खान सरदार खान (३२, रा. अरूण नाईक ले आऊट, पुसद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अमजद खान हा देशी कट्टा विक्रीतीलही मास्टरमाईंड आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरखेड येथील शासकीय कुटीर रूग्णालयातील डॉ. हनमंत संतराम धर्मकारे (४२) यांची ११ जानेवारी २०२२ रोजी पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटलसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी व्यंकटेश संतराम धर्मकारे याने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खूनप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर फरार असलेल्या शेख ऐफाज शेख आबरार उर्फ अपू या मुख्य आरोपीला २४ दिवसानंतर मध्यप्रदेशातील धार येथून अटक करण्यात आली होती. त्यापूर्वीच अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, डॉ. धर्मकारे यांचा खून करण्यासाठी देशीकट्टा उपलब्ध करून देणारा अमजद खान हा घटनेपासून फरार होता.

हेही वाचा : अपघातवार! यवतमाळात २४ तासांत विविध पाच अपघातात सात ठार; भरधाव दुचाकी ठरतेय काळ…

फरार असतानाही २०२३ मध्ये त्याने पुसद शहराच्या हद्दीत एका जणावर प्राणघातक हल्ला केला होता. जिल्ह्यात घडणार्‍या गुन्ह्यात देशीकट्ट्याचा वापर वाढत असल्याने अमजदचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पथकाला दिले. दरम्यान अमजद खान उमरखेड शहरात आला असून, त्याच्याकडे देशीकट्टा असल्याची माहिती पथकास मिळाली. उमरखेड ते हदगावकडे जाणार्‍या मार्गावर पेट्रोल पंपाजवळ उभा असताना पोलीस दिसताच त्याने पळ काढला. आरोपीकडे देशीकट्टा असतानाही पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : नौदल नागरी परीक्षा ! भरली जाणार नऊशेवर पदे

अंगझडतीत त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडून ५४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, योगेश टेकाम आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal mastermind behind the murder of a doctor in umarkhed arrested after 2 years nrp 78 css
Show comments