यवतमाळ : गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर रेती व माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी मोडके हे गंभीर जखमी झाले असून तहसील कार्यालयाचे वाहन चालक आडे किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील काळी टेंभी परिसरात ही घटना घडली. बुधवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी महागाव तहसील कार्यालयात विभाग निहाय आढावा बैठक घेतली. फुलसावंगी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे. ही गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सक्त कारवाईचे आदेश दिले होते.
हेही वाचा : चंद्रपूर : दोन वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ, उर्जानगर वसाहत परिसरात सतर्कतेचा इशारा
आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महागाव तहसील कार्यालयाचे रात्र गस्ती पथक फुलसावंगी परिसरात टेहळणी करीत असताना काळी टेंभी येथे मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथक कारवाई करण्यासाठी सरसावले असता १० ते १५ गौण खनिज तस्करांनी तलाठी मोडके यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला, तसेच तहसीलच्या वाहनाचे चालक आडे यांनाही मारहाण केली. त्यानंतर गौण खनिज तस्कर पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाठी मोडके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. महागाव शहरासह तालुक्यातील गौण खनिज तस्कर शिरजोर झाले आहेत.