यवतमाळ : देशात २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव देऊन चूक केली, अशी टीका करत त्यांच्या ‘इंडिया’तील प्रत्येकाला पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. रिपाई (आ.) प्रशिक्षण शिबिरासाठी यवतमाळ येथे आले असता त्यांनी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत संवाद साधला. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीसोबत लढणार असून त्यात रिपाई (आ.) ला सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वासही आठवले यांनी येथे व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांना हरविणे सोपे नाही. मोदी यांच्या सरकारमध्ये लहान पक्षांनाही मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे भाजप हे लहान पक्षांना संपवित असल्याचा विरोधकांकडून करण्यात येत असलेला आरोप चुकीचा आहे, असे आठवले म्हणाले. खासदार विनायक राऊत यांनी आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर दिली. मात्र विरोधकांच्या जागाच निवडून येणार नाहीत. त्यामुळे ऑफर देणे चुकीचे आहे. परंतु, उद्धव ठाकरे आमच्याकडे आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ. शिवसेनेला भाजपने फोडले नाही. तर, उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. वैचारिक परंपरेला छेद दिल्याने पक्षफुटीची नामुष्की आली.
हेही वाचा : एमपीएससी: बहुचर्चित परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
लोकसभा निवडणुकीत दोन आणि विधानसभा निवडणुकीत १५ जागा मिळविण्याचा रिपाईचा प्रयत्न आहे. देशभरात करण्यात आलेल्या विकासकामांमुळे मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमचा पक्ष आहे, त्यामुळे कोणतीही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले. अजित पवार महायुतीत आल्याने ताकद वाढली आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहणार आहेत. विरोधकांकडून करण्यात येणारी चर्चा निरर्थक असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस दयाल बहादुरे, राजाभाऊ सरवदे, बापूराव कदम, गौतम सोनवणे, सुधाकर तायडे, मोहन भोयर, महेंद्र मानकर, नवनित महाजन, गोविंद मेश्राम, अश्वजित शेळके, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : सावंगी रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया कार्यान्वित, मध्यभारतात प्रथमच
चंद्रयानावर कविता
‘भारत देशाचे सर्व सायंटीस्ट आहे आमची जान, म्हणूनच पाठविले चंद्रयान, आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान, म्हणूनच नरेंद्र मोदींनी पाठविले चंद्रावर यान’, या कवितेतून चंद्रयान मोहिमेची महती मंत्री आठवले यांनी यावेळी सांगितली.