यवतमाळ : माकडचाळे आणि माकडचेष्टा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. माकडांच्या प्रतापाने घडलेला प्रसंग हास्यास्पद आणि कधीकधी भयावहही ठरतो. काही घटनांमध्ये मानवी चाळे माकडांना चिडवून सोडणारे ठरतात. यातून माकडांकडून मानवांवर हल्ल्याच्या घटना घडतात. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात माकडांनी केलेले चाळे महिलेला आर्थिकदृष्ट्या चांगलेच महागात पडले. येथे माकडाने एका महिलेची कमाई आणि मंगळसूत्रही हिरावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाले असे की, एका माकडाने पायी जात असलेल्या महिलेवर हल्ला करीत तिच्या गळ्यातील पर्स हिसकावली आणि ती पर्स रोख ३५ हजार रुपये व सोन्याच्या एक तोळ्याच्या पोतसह कोल्हापुरी बंधाऱ्यात फेकली. ही घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगीनजिकच्या हिंगणी फाट्याजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यावर मंगळवारी दुपारी घडली.

हेही वाचा : खून, जाळपोळ अन् चकमकींसह स्फोटातही सहभाग; दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक

कान्होपात्रा संतोष मस्के (३०) या आपल्या दोन लहान मुलांसोबत फुलसावंगी येथून एक किमी अंतरावरील हिंगणी फाटा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पुलावरून पायी जात होत्या. यावेळी कोल्हापुरी बंधाऱ्यावर चार लालतोंडाची माकडे बसली होती. या लालतोंडाच्या माकडांनी कान्होपात्रा मस्के यांच्यावर हल्ला केला. माकडांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावली. कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर बसून माकडांनी पर्समध्ये काही खाण्याचे सामान आहे का, याचा शोध घेतला. पर्समधील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त केले आणि ती पर्स कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात फेकून दिली. या पर्समध्ये ३५ हजार रुपये रोख आणि एक तोळ्याची सोन्याची पोत होती.

या घटनेमुळे भेदरलेली महिला आणि तिची मुले पुलावरच थांबले. महिला रडत बसली होती. यावेळी बंधाऱ्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्या महिलेला रडण्याचे कारण विचारले असता तिने घडलेली घटना सांगितली. बंधाऱ्याखाली काही भोई बांधव मासेमारी करीत होते. लोकांनी त्यांना महिलेसोबत घडेलेला प्रकार सांगितला. महिलेची स्थिती पाहून भोई बांधवांनी बंधाऱ्यात उडी घेतली. त्यांनी बंधाऱ्याच्या पाण्यात शोधाशोध करीत १४ हजार रुपये काढून दिले. उर्वरित २१ हजार रुपयांची रक्कम मिळू शकली नाही. तसेच एक तोळ्याची सोन्याची पोतही पाण्यात वाहून गेली.

हेही वाचा : पाच मित्र…भरधाव कार…इंस्टावर रिल टाकण्यासाठी मोबाईल हातात घेतला अन्…

या कोल्हापुरी बंधाऱ्यावर नेहमीच चार माकडे बसून राहतात. रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांच्या हातातील वस्तू हिसकावून घेतात. फुलसावंगी ते हिंगणी हा दोन किमी पाणंद रस्ता असून या रस्त्याने शाळेतील मुले आणि मुलीदेखील रोज ये-जा करीत असतात. या उपद्रवी माकडांच्या मर्कटलीलांमुळे पादचारी त्रस्त आहेत. वनविभागाने त्वरित या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वनविभागाकडून यावर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal monkey attack on woman snatched her purse and golden chain thrown it into the lake nrp 78 css
Show comments