यवतमाळ : उकाड्याने त्रस्त झाल्याने कुलर लावून समाधान शोधण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. घरातील कुलर सुरू करताना मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का लागला. या घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे घडली.

हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर वाढणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार; हवामान खाते म्हणते…

अनिता सुनील राठोड (३५), कुणाल सुनील राठोड (९) रा. दाभडी, अशी मृतांची नावे आहेत. महिला रोजमजुरी करून सायंकाळी घरी आली. उकाड्यामुळे मुलगा कुणाल याने कुलर सुरू केला. त्याला विजेचा धक्का लागताच आई वाचविण्यासाठी गेली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तपासणी करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे दाभडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader