Tiger Death due to Paralysis : वेदनेने विव्हळत असलेल्या, पण मागील दोन्ही पाय उचलू न शकता येणाऱ्या वाघिणीला अखेर तातडीची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन रात्री उशिरा बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. पांढरकवडा वनक्षेत्रातील ‘टी-९’ या वाघिणीची तो मादी बछडा होता. अर्धांगवायूसोबतच या वाघिणीला अतिसाराचाही फटका बसला. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गोरेवाडा बचाव केंद्रात शवविच्छेदन करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र कक्ष क्र. २० (ब) सावळी रोपवनामध्ये वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याचे मंगळवारी आढळून आले. वाघिणीला मागचा पाय उचलताच येईना, त्यामुळे ती एका जागेवरुन दुसऱ्या जागी चालू शकत नव्हती. या परिस्थितीत तिच्या जीवाला धोका असल्याने तिला उपचारासाठी जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वाघीणीला बेशुध्द करण्याकरीता औषध तयार केले व ते अजय मराठे (निशानेबाज) यांनी सदर वाघीणीच्या डाव्या खांद्यावर अचुक निशाना साधुन रात्री ८.२९ वाजता तिला डार्ट मारला. वाघीण बेशुध्द झाल्यानंतर तीची तपासणी केली असता, सदर वाघीण फारच अशक्त असुन तिच्या मागील पाय लुळे झाल्याचे दिसून आले. सदर वाघीणीला अर्धाग्यवायु झाला असल्याचा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी अंदाज वर्तविला. त्यानंतर सदर वाघीणीचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.

सदर वाघीणीस पुढील उपचाराकरीता गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपुर येथे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही कार्यवाहीस धनंजय वावभासे, उपवनसंरक्षक पांडरकवडा वनविभाग पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली व संगिता कोकणे, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) वणी यांनी व टी. एन. साळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन, वंदना विधाते, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुनिता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचावचे सदस्य विकास ताजणे, योगेश लाकडे, प्रफुल वाटगुरे, गुरुनानक ढोरे, दिपेश टॅर्मुणे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर, एम २९ संस्थेचे अध्यक्ष निलेश मेश्राम, वनपरिक्षेत्र मुकुटबन मधिल वनकर्मचारी एस. एन. मिलमिले, क्षेत्र सहाय्यक पवनार, एस. डी. चव्हाण, वनरक्षक जुनोनी, एस. एन. गोंड, वनरक्षक दाभाडी, एस. एम. सिडाम, वनरक्षक भेंडाळा, एस. डब्ल्यु. जुनगरी, वनरक्षक हिरापुर व जलद बचाव पथक पांढरकवडा मधिल कर्मचारी उमेश गोहकार, वनरक्षक, सचिन येडमे वनरक्षक, दिनेश भोयर वनरक्षक, सचिन पिकलिकवार वनरक्षक यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली.