यवतमाळ : विदर्भ-मराठवड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीकाठी वसलेले वरुड(तुका) हे ४०० लोकवस्तीचे गाव ‘ग्रामहित’मुळे जगाच्या नकाशावर आले. येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व अन्य कारणांनी एकल संसार करणाऱ्या भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली. गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबांतील प्रमाखाचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. कुटुंब प्रमुख नसल्यानं घरातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार रोहित पवार यांनी कुटुंबातील महिलेशी संवाद साधला. ‘ताई मी तुमच्यासाठी काय करू शकतो’, असा प्रश्न रोहित यांनी विचारतात महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला.
भाऊबीजेला आलेल्या शंभराहून अधिक महिलांचीही अशीच व्यथा आहे. या महिलांच्या वाट्याला आलेले दुःख, वेदना बघून रोहित पवार व त्यांच्या परिवाराचा कंठही दाटून आला. या भगिनींच्या आयुष्यात प्रकाशदीप उजळण्यासाठी शासनदरबारी त्यांचे प्रश्न मांडू व न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे रोहित पवार यांनी यावेळी आश्वस्त केले. सोमवारी हा भावनिक प्रसंग बघून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा असलेल्या यवतमाळातील हा दौरा रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचाच एक भाग होता.
हेही वाचा : नागपूर: शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू; आशा रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या दुर्गम परिसरातील पैनगंगा बुडीत क्षेत्रात असलेल्या वरुड (तुका) या आदिवासीबहुल गावात रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा, बहिण सई, पत्नी कुन्ती, सलील देशमुख, वर्षा निकम आदी आले होते. शेतकरी कुटुंबांची भेट घेताना पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी बाजीवर बसत गावात चहा व नाश्ता घेतला. वरुड (तुका) येथील ग्रामहीत संस्थेच्या माध्यमातून भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १६८ महिला उपस्थित होत्या. या महिलांशी आमदार पवार यांनी संवाद साधला. महिलांनी आमदार पवार यांना ओवाळत आपल्या व्यथाही सांगितल्या.
हेही वाचा : महागाईतही नागपुरात ५०० कोटींहून अधिकची उलाढाल… दिवाळीत या वस्तूंकडे कल
आपल्यावर बेतलेली परिस्थिती कथन करताना अनेकींना अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबाकडुन महिलांना साडी-चोळी वाटप करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, फराळाचं साहित्यही देण्यात आलं. आमदार पवार यांनी ग्रामस्थांना शासनाच्यावतीने सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा : दिवाळीत विजेची मागणी २३ हजार मेगावाॅटहून कमी.. हे आहे कारण..
यवतमाळ जिल्ह्यातील समस्या, निम्न पैनगंगा प्रकल्पाची कामं याबद्दल येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करू असंही पवार यावेळी म्हणाले. यावेळी ग्रामहीत संस्थेचे पंकज महल्ले, श्वेता महल्ले, वरुड तुकाच्या सरपंच प्रतिभा मंगाम, नितीन खोडे पाटील, मुबारक तंवर, विजय राऊत, प्रल्हाद जगताप, प्रल्हाद गावंडे, बालाजी येरावार यांनी आमदार पवार यांना परिसरा होत असलेल्या धरणामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. गावात दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी नृत्य करीत आमदार पवार यांचं स्वागत केलं. आमदार पवार यांनीही यावेळी नृत्याचा फेर धरून या नृत्यातील कलाकारांना पुण्यात आमंत्रित करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास शेकडो नागरिक उपस्थित होते.