यवतमाळ : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेले पाटणबोरी हे गाव आंतरराज्य जुगाराचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. या गावात जुगाराचा ‘जॅकपॉट’ लागेल या आशेने आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूपासून जुगारप्रेमी येतात. गावात सोशल क्ल्बच्या नावाखाली उघडलेल्या इनडोअर क्लबमध्ये दिवसरात्र दम, दमा, दम करत रम, रमा, रमीची चैन चालत असल्याने पाटणबोरीसह सीमावर्ती भागातील सामाजिक वातावरण गढूळ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरांमध्ये ‘नाईट क्लब’ पद्धत राजरोस सुरू असताना ग्रामीण भागात सोशल क्लबच्या माध्यमातून दिवस रात्र मटका, जुगारअड्डे सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवरील पाटणबोरी हे गाव या जुगारअड्ड्यांचे प्रमुख केंद्र बनले आहे. वणी ही ‘कोलसिटी’ म्हणून ओळखली जाते. वणी, मुकूटबन येथील खनीज पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. या परिसरातील आर्थिक सुबत्तेमळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावले आहे. पाटणबोरी येथे असलेला एक ‘सोशल क्लब’ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जुगाराच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल करत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

हेही वाचा…आषाढी एकादशीचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय?

हल्ली ग्रामीण भागात ‘सोशल क्लब’ जागोजागी उघडले जात आहेत. बहुद्देशीय संस्थेच्या नावाखालीसुद्धा असे सोशल क्लब चालविले जातात. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळसह पांढरकवडा, वणी, पाटणबोरी, मारेगाव, पुसद आदी ठिकाणी हे सोशल क्ल्ब सुरू असून या क्लबच्या माध्यमातून अपेक्षित क्रीडा प्रकारांऐवजी मटका, जुगार, बार असे अवैध व्यवसाय केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सोशल क्लबच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतर मंत्रालयातून मंजुरी घ्यावी लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोशल क्लबला मंत्रालयातून मंजुरी मिळणे बंद असल्याची माहिती आहे. यवतमाळ शहरालगत एका फार्ममधील सोशल क्लबसाठी सताधारी आमदाराने प्रतिष्ठेचा विषय करून काही वर्षांपूर्वी मंत्रालयातून अशी परवानगी आणली होती. मात्र पाटणबोरी येथे कोणत्याही परवानगीशिवाय सोशल क्लब सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल क्लबच्या नावाखाली येथे एका बारमध्ये वरच्या मजल्यावर जुगार अड्डा भरविला जातो.

सोशल क्लब सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यत चालविण्यास परवानगी असते. मात्र पाटणबोरी येथे २४ तास जुगार अड्डा चालविला जात असून या ठिकाणी आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील ग्राहक महागड्या वाहनांमधून कायम पैसे घेवून आलेले असतात. या सोशल क्ल्बमध्ये सकाळपासूनच आठ ते दहा ‘टेबल’ चालतात. पूर्वी येथे २७ पत्त्यांची रमी चालायची, आता ३१, ३३ पत्त्यांची रमी चालत असून, ती पाच, सात, दहा, बारा रूपये पॉईंटप्रमाणे खेळली जाते, अशी माहिती आहे. सोशल क्लबची परवानगी असल्यास या क्ल्बमध्ये इनडोअर गेम चालवावे लागतात. मात्र येथे पैसे लावून खेळ खेळता येत नाही. त्यामुळे पाटणबोरी येथे सुरू असलेल्या सोशल क्लबमध्ये सुरू असलेले सर्व खेळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा संशोधनाचा विषय आहे. परप्रांतीय ग्राहक या परिसरात जुगार, दारू आदी व्यसनांसाठी येत असल्याने या जुगार अड्ड्यांमुळे सीमावर्ती भागातील सामाजिक वातावरणही बिघडल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा…नागपूरमध्ये वंचितचे कार्यकर्ते भाजपात

माहिती द्या, लोकेशन पाठवा कारवाई करू !

या संदर्भात पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांना विचारणा केली असता, कसला ‘सोशल क्लब’, हा क्लब काय असतो, असा प्रतीप्रश्न करून पाटणबोरी येथे असा कोणताही क्लब चालत असल्याची माहिती नाही, असे ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. या परिसरात कोणताही जुगार चालत नाही, असे ते म्हणाले. आपल्याकडे काही माहिती असल्यास ती द्या, लोकेशन पाठवा कारवाई करू, असे उत्तर एसडीपीओ वैंजणे यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal patanbori village as inter state gambling hub igniting concerns over social clubs nrp 78 psg
Show comments