यवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खासगी ट्रॅव्हल्सचे दरपत्रक प्रसिद्ध करूनही अनेक खासगी ट्रॅव्हल्स संचालक प्रवाशांची आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र आहे. पुणे-यवतमाळ खासगी बसचे भाडे तब्बल पाच हजार रुपयापर्यंत आकारण्यात येत आहे. एवढ्या तिकिट दरात विमान प्रवास शक्य आहे. तक्रारीसाठी शासनाने सुरू केलेला हेल्पलाइन क्रमांकही अवैध दाखवत असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बसेसने आकारावयाचे महत्तम भाडे दरपत्रक येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जाहीर केले. शासन निर्णयानुसार खासगी ट्रॅव्हल्स बसेस व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या दीडपट भाडे आकारणी करता येते. प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे दिसून आल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काढले आहे. बसच्या तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात आल्याचे आढळल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येणार करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जादा भाडे आकारले तर आम्ही काय करू?
प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स बसेसने अधिक भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार हेल्पलाईन क्रमांकांवर किंवा इमेलवर करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. यवतमाळ येथील प्रवाशी नितीन भागवते यांच्या मुलाकडून १० नोव्हेंबर रोजीच्या पुणे-यवतमाळ भाड्यापोटी चक्क चार हजार ७४६ रुपये भाडे आकारण्यात आले. संदर्भात तक्रार देण्यासाठी त्यांनी परिवहन विभागाने दिलेल्या हेल्पलाईन व टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा हेल्पलाईन क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात येत होते, तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे तर आम्ही काय करू?” असे उर्मट उत्तर देण्यात आले. भागवते यांनी या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली.
हेही वाचा : प्रेमविवाहानंतर चार वर्षे सुखी संसार, नंतर कौटुंबिक वाद; पत्नी निघाली दुसरे लग्न करायला, पुढे झाले असे की…
२७ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के अतिरिक्त भाडे आकरण्याची मुभा
एसटी महामंडळाचे प्रवासभाडे दर ८ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १० टक्के अधिक आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खासगी बस वाहतूकदारांना मुभा देण्यात आली आहे. ही मुभा आजपासून २७ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. मात्र सर्व खासगी बस वाहनसेवा पुरवठादारांनी परिवहन विभागाने ठरवलेले भाडे दरपत्रक तिकीट बुकिंग कार्यालयात तसेच बसमध्ये प्रर्दशित करण्याच्या सूचनाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. मात्र बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सने या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.