यवतमाळ : पुसद तहसील येथे मृत्यूची नोंद घेऊन मृत्यू दाखला देण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लिपिकाचे तक्रारदारानेच स्टिंग ऑपरेशन केले. त्याचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर महसूल विभागाने याची दखल घेत लिपिकावर तत्काळ कारवाई करीत शनिवारी त्याला निलंबित केले आहे. बाळू पवार असे या लिपिकाचे नाव आहे. या प्रकाराने महसूल विभागातील भ्रष्ट यंत्रणेची पोलखोल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळू पवार हा जन्म-मृत्यू विभागातील सेतूमध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी गजानन तोडक यांनी पुसद तहसीलमध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूची नोंद घेण्याकरिता रीतसर अर्ज सादर केला. गजानन तोडक यांचे वडील तुकाराम यांचा २९ फेब्रुवारी १९७४ रोजी मृत्यू झाला. काही कारणास्तव मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. आता गजानन यांना आपल्या वडिलांच्या मृत्यू नोंद दाखल्याची आवश्यकता पडली. वारंवार विनंती करूनही लिपिक बाळू पवार हा दाखला देत नव्हता. या कामासाठी लिपिक पैसे मागत होता. या त्रासाला कंटाळून गजानन तोडम यांनी पैसे मागतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. गजानन यांनी हा व्हिडीओ पुसद तहसीलदार महादेव जोरवार यांना दाखविला. तहसीलदार महादेव जोरवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बाळू पवार याच्या निलंबनाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवला. या अहवालानंतर बाळू पवार याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब नागरिकांची सेतू, तहसील, भूमी अभिलेख आदी विभागात कामासाठी अडवणूक केली जाते. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी ही नित्याचीच बाब झाली होती. त्यातही कुठलाही संकोच न बाळगता सर्वांसमोर बिनदिक्कत पैसे मागणारा बाळू पवार हा लिपिक चर्चेत होता. सामान्य नागरिकाने त्याचे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई आल्याने आनंद व्यक्त होत आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली, लहान माणसांनी यावर बोलू नये”, काय म्हणाले नाना पटोले?

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेतू केंद्र हे पैसे उकळण्याचे केंद्र झाले आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आणि विविध प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची सेतू केंद्रांवर गर्दी आहे. प्रत्येक सेतू केंद्रावर कुठल्या प्रमाणपत्रासाठी किती रुपये आकारायचे, याचे दर ठरलेले आहे. मात्र येथे नागरिकांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. कळंब येथील एका सेतू केंद्रावर नुकताच हा प्रकार उघडकीस आला होता. असाच प्रकार तालुक्याच्या आणि यवतमाळातील काही सेतू केंद्रांवर सुरू असल्याच्या नागरिकांची तक्रार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal pusad tehsil clerk suspended demand bribe for death certificate nrp 78 css