यवतमाळ : ‘वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून परत येत असताना आपल्या खासगी वाहनाचा आर्णी तालुक्यातील कोपरा गावानजिक अपघात झाला. मी या वाहनातून प्रवास करीत नव्हतो. अपघात भीषण असला तरी सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. पोलीस या अपघात प्रकरणी चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतील’, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी व्यक्त केली.

ते आज शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांवरून शुक्रवारी पहाटे माझ्या वाहनाचा अपघात झाल्याच्या बातम्या सुरू आहेत. मात्र ज्या वाहनाचा अपघात झाला त्यात आपण नव्हतो. पोहरादेवी येथे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच बैठक आटोपून माजी खासदार उमेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांसमेवत आपण त्यांच्याच वाहनातून यवतमाळकडे परत येत होतो. त्यामुळे आपण सुखरूप आहोत. अपघात केवळ वाहनाचा झाला, आपला नाही, असे संजय राठोड म्हणाले.

हेही वाचा : वरती मेट्रो, खाली रेल्वे, मध्ये रस्ता अन् आणखी बरेच काही…देशातील पहिला उड्डाणपूल

आपले खासगी वाहन चालक पुढे घेऊन निघाला. दिग्रस-आर्णी मार्गावर कोपरा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता खराब आहे. येथे समोरील वाहनाचे नियंत्रण गेल्याने मागे असलेल्या वाहनाची समोरच्या वाहनाला जोरदार धडक लागली. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. याच वाहनामागे माझा ताफा होता. मी घटनास्थळी थांबून जखमींना सर्वप्रथम उपचारासाठी नेले. पोलिसांना माहिती देवून यवतमाळात परतलो, असे संजय राठोड म्हणाले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. रस्ता कंत्राटदार, वाहन चालक यापैकी जे दोषी असतील त्यांच्यावर चौकशीअंती निश्चितच कारवाई होईल, असे राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा : ड्रग्जचा विळखा! राज्यात मुंबई पाठोपाठ नागपुरात सर्वाधिक अंमली पदार्थ विक्री

ही घटना निव्वळ अपघातच आहे. घातपात असण्याची कोणतीही शक्यता नाही. आपण सुखरूप असून, अपघातातील जखमींना किरकोळ इजा झाली. उपचारानंतर त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोहरादेवी येथे येत असल्याने आपण सध्या त्या कार्यक्रमात व्यस्त आहोत. उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी राज्यभरातून बंजारा बांधव पोहरादेवी येथे पोहचत आहेत. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन झाले असून नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता सभास्थळी पोहचावे, असे आवहनही संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला जीवन पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, पराग पिंगळे आदी उपस्थित होते.

Story img Loader