यवतमाळ : सामाजिक सौहार्द बिघडविण्यासाठी समाज माध्यमं सध्या जळते निखारे ठरत आहे. अशीच घटना पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री येथे मंगळवारी घडली. एका तरूणाने समाज माध्यमांतून दोन महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. ही पोस्ट झळकताच शेंबाळपिंप्री येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने चिघळलेले सामाजिक वातावरण शांत झाले.

शेंबाळपिंप्री येथील एका युवकाने दोन महापुरुषांबदल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. ती नागरिकांनी बघताच जमावाने शेंबाळपिंपरी येथील पोलीस चौकीवर धडक दिली. सबंधित तरूणांवर त्वरित कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्याची मागणी केली. गावातील नागरिकांनी बाजारपेठ व गावंबंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ, बस स्थानक परिसरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली. त्यामुळे गावात तणाव पूर्ण शांतता होती.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे, खंडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवानंद कायंदे, सुरेश राठोड, गोपाल मोरे आदी आणि दंगलग्रस्त पथक गावात पाहोचले. खंडाळा पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपीवर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्याला तडीपार करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानी जामावास शांतता राखण्याचे आवाहन केले. ठाणेदार देविदास पाटील यांच्या भ्रमणध्वनीवरून अप्पर पोलीस अधीक्षकांनी दोन्ही समाजांना आपापल्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संबंधिंतावर गुन्हे दाखल करून तडीपारीची आणि ऍट्रॉसिटी कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावरुन शेंबाळपिंपरी येथील सुमेध संजय मनवर (२५) रा. शेंबाळपिंपरी यांची जबानी तक्रार देण्यात आली. तर विशाल सुरेश देशमुख (२७) रा. शेंबाळपिंपरी यांची जबानी तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच लक्ष्मण कांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश पागिरे, डॉ.अजित चंदेल, सौपू पाटील, राजू वाहूळे, बापूराव कांबळे, सुनील वाहूळे, समीर देशमुख, राजरत्न मनवर, विजय कांबळे, चेंद्रमनी मनवर, केरबा कांबळे, विशाल देशमुख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकारणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा ठाण्याचे निरीक्षक देविदास पाटील करत आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.