यवतमाळ : संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. ‘येलो मोझॅक व्हायरस’मुळे ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या व्हासरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. या तीन राज्यांत सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने सोयाबीनवर हा व्हायरस आल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या व्हायरसमुळे सोयाबीनचे पीक अचानक वाळत आहे. त्याला किडीसह आतमधून पोखरले गेले आहे. सोयाबीन पिवळे आणि काळेही पडत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर काळे ठिपके आहेत. पानावरही डाग पडत आहेत. यातून शेंगा वेळेपूर्वी वाळत असल्याने शेंगा भरण्याचे प्रमाण थांबले आहे. या खरीप हंगामात अर्ली व्हेरायटी सोडून सोयाबीनच्या इतर व्हेरायटींवर मोठया प्रमाणात ‘येलो मोझॅक’चे आक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘फुले संगम’ नावाची सोयाबीनची व्हेरायटी शेतकऱ्यांना वाटली होती. शेतकऱ्यांनीसुध्दा विश्वास ठेऊन याच व्हेरायटीची मोठया प्रमाणात लागवड केली. आज हीच व्हेरायटी रोगाला बळी पडली आहे. या कीडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा : वर्धा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आता नव्याने मतदार नोंदणी, जाणून घ्या सविस्तर…
सोयाबीनचे उत्पादन घटले तर याचा थेट परिणाम दरावरसुद्धा होणार असल्याने शेतकरी खचला आहे. कापसावर लाल्या रोग आल्यास ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्याच धर्तीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी शासनाकडे केली आहे. कृषी विभागाने वाटलेल्या व्हेरायटीवरच अधिक कीड पडली आहे. मात्र कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करुन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. शासनाने दखल न घेतल्यास सोयाबीन बियाणे कंपनी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच कृषी विक्रेते यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे.