यवतमाळ : दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी शाळास्तरावर सुरू झाली आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे नियोजन अमरावती विभागीय परीक्षा मंडळाने केले आहे. परीक्षेदरम्यान केंद्रावर पाच पेक्षा जास्त कॉपी आढळल्यास केंद्रच रद्द करण्याचा इशारा परीक्षा मंडळाच्या बैठकीत मुख्याध्यापकांना देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. जानेवारी महिन्याचा पंधरवडा तोंडवार येताच अमरावती विभागीय परीक्षा मंडळ परीक्षेच्या संदर्भाने नियोजन सुरू केले आले आहे. मंडळाच्या सहायक सचिव साळुंके, अधीक्षक सुरेश पाचंगे, अधीक्षक नंदकिशोर साखरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, शिक्षण उपनिरीक्षक योगेश डाफ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात पुसद व यवतमाळ येथे दोन सत्रात ही बैठक झाली.
हेही वाचा : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात दररोज १९० नवीन वीज जोडण्या; सर्वाधिक जोडण्या…
पुसद येथील बैठकीला पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस येथील मुख्याध्यापक उपस्थित होते. दोन सत्रात सलग बैठक घेऊन मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. यवतमाळात १३ तालुक्यातील मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. यात पहिल्या सत्रात यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, नेर, आर्णी, दारव्हा, बाभूळगाव आणि दुसर्या सत्रात पांढरकवडा, वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल दावा ठोकणार? म्हणाले, “आम्ही लढण्याचा निर्णय घेतला तर…”
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत परीक्षा चालणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्चपर्यंत चालणार आहे. नियमित प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसान होऊ नये, यासाठी यंदाही कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले. गेल्या वर्षी मुकुटबन व पुसद तालुक्यातील काटखेडा येथे कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मुकुटबनच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. जिल्ह्यातील संवेदशनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. भरारी पथक व बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात राहणार असून, कॉपी आढळल्यास विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात येणार आहे. तर, वर्गावर राहणार्या पर्यवेक्षकांवर कार्यकाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.