यवतमाळ : नांदेडवरून नागपूरकडे जाणारी बस उमरखेड तालुक्यातील गोजेगावनजीक पैनगंगा नदी पुलाजवळ अडवून बसची तोडफोड करीत बस जाळण्यात आली होती. २७ ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेतील तीन आरोपींना उमरखेड पोलिसांनी शुक्रवारी मराठवाड्यातील हदगाव येथून अटक केली. आकाश हुलकाने (२३), शिवराज कदम (२५), चेतन राठोड (२५, तिघेही रा. हदगाव), अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. तब्बल २८ दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
२७ ऑक्टोबर रोजी नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११ वाजता दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा पुलाजवळ आली. तेथे दोन दुचाकीस्वारांनी बस थांबविली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अनोळखी तरुणांनी बसच्या काचा फोडल्या. सर्व प्रवाशांना खाली उतरवून बसच्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावली व आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
हेही वाचा : गोंदिया : तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी बाजारात लगबग; शहरात उसाची दुकाने थाटली
या आगीत बस जळून खाक झाली होती. यात बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी बसचालक बी. डी. नाईकवाडे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी आरोपींविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला होता. बस जाळणारे आरोपी हे हदगाव येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार शंकर पांचाळ, पोलिस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार केली.