यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरानजिकच्या जंगलात वाघाचा मुक्काम आहे. हा वाघ अनेक नागरिकांना दर्शन देत असून, परिसरात आतापर्यंत तीन जनावरांचा फडशा या वाघाने पाडला आहे. प्रारंभी घाटंजी मार्गावरील बोधगव्हाण, बरबडा, जांब या परिसरातील जंगलात आढळलेला वाघ शुक्रवारी सायंकाळी दारव्हा मार्गावरील जामवाडी जंगलात आढळला. या वाघाने बोधगव्हाण शिवारात एका गायीवर हल्ला केला. मात्र लोकांनी आरडा ओरड केल्यानंतर तो पळून गेला. त्यानंतर त्याने शहरानजीकच्या शिवारात गाईची आणि बैलाची शिकार केली तर शुक्रवारी सायंकाळी दारव्हा मार्गावर जामवाडी शिवारात ज्ञानेश्वर जाधव यांच्या म्हशीवर हल्ला केला. जामवाडी तलाव परिसरात म्हशीचा कळप होता. यावेळी वाघाने एका म्हशीवर हल्ला केला. गुराख्याने आराडाओरड केल्याने वाघ पळून गेला तर म्हैस तलावाच्या पाण्यात शिरली. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. तेव्हा हा वाघ उमर्डा नर्सरीकडे गेल्याचे आढळले. १५ दिवसांपूर्वी नेर मार्गावरील चिचबर्डी जंगलात वाघाने गणपत पाने यांच्या गायीची शिकार केली होती. त्यांनतर लासीना शिवारात राजेंद्र डांगे यांच्या शेतात बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे आता नागरिकांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे. सध्या सोयाबीन कापणीचा काळ आहे, मात्र वाघाच्या भीतीने शहराजवळच्या गावांमध्ये मजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत.

हेही वाचा : प्लास्टिक सर्जरीने अपंगत्वावर मात, विदर्भात फक्त इथेच…

शुक्रवारी सायंकाळी वाघाने म्हशीवर हल्ला केल्यानंतर हा वाघ दारव्हा मार्गावर अनेक प्रवाशांना दिसला. दारव्हाचे माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक यांनी त्यांच्या कारमधून या वाघाचे चित्रीकरण केले. तर गोदावरी अर्बन बँकेचे व्यवस्थापक रवी इंगळे यांनीही या वाघाचे चित्रीकरण करून वन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. सध्या समाज माध्यमांवर यवतमाळनजीक फिरणाऱ्या वाघाचे अनेक व्हिडीओ प्रसारित होत आहे. हा एकच वाघ आहे की, नर, मादी वाघाची जोडी या परिसरात फिरत आहे, याबाबत विविध चर्चा आहे.

वन विभागाने जांब परिसर आणि दारव्हा मार्गावर दोन वेगवेगळे वाघ असल्याचे म्हटले आहे. यवतमाळ शहराच्या चारही बाजूने घनदाट जंगल असल्याने येथे पूर्वीपासूनच वाघांचा अधिवास आहे. मात्र कालांतराने वाघ लुप्त झाले. पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्याची निर्मिती झाल्यानंतर हे अभयारण्ये वाघांसाठी सुरक्षित अधिवास म्हणून उदयास आले. आज ताडोबानंतर टिपेश्वरमध्ये सर्वाधिक वाघ असून ते पर्यटकांना हमखास दर्शन देतात. यवतमाळनजीक फिरत असलेला वाघ हा टिपेश्वरमधूनच बाहेर पडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरालगतच्या परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. वन विभागाची रेस्क्यू टिम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.