यवतमाळ : वणी तालुक्यातील सुकनेगाव जंगलातील एका तलावाकाठी वाघांच्या दोन बछड्यांचा चार दिवसांपूर्वी भुकेने व्याकुळ होऊन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बछड्यांच्या आईची शोधमोहीम वनविभागाने तीव्र केली होती. या शोध मोहिमेस अखेर यश आले असून, तलावाच्या काठावर लावलेल्या कॅमेऱ्यात ही वाघीण ट्रॅप झाली. शुक्रवारची रात्र वनाधिकाऱ्यांनी या तलावाकाठी वाघिणीच्या प्रतिक्षेत जागुण काढली. या वाघिणीसोबत असलेला बछडाही सुरक्षित असल्याचे वन विभागाने सांगितले. सुकनेगाव जंगलातील महसूल विभागाच्या जागेत असलेल्या तलावाकाठी या वाघिणीच्या एका बछड्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला होता. त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी गुरूवारी पुन्हा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती.
हेही वाचा : नागपूर : फुल व्यापाऱ्याच्या घरात घुसले दरोडेखोर; वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावून…
दोनही बछड्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिकारीच्या शोधात निघून गेलेली आई परत न आल्याने भुकेने व्याकूळ होऊन या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ही वाघिण नेमकी कुठे गेली, याचा शोध वन विभागाने सुरू केला. शुक्रवारी रात्री कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मोठा ताफा रात्रभर तलाव परिसरात डेरा टाकून होता. शनिवारी पहाटे ही वाघिण तलावात पाणी पिऊन परत जात असताना कॅमेऱ्यात ट्रॅप झाली. या वाघिणीच्या हालचालींवर वन विभाग लक्ष ठेऊन आहे. वाघीण सुखरूप असल्याने वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
हेही वाचा : नागपूर : धक्कादायक ! तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून देहव्यापार
तलावातील पाणी पिऊन परत जाताना या वाघिणीने वाटेत केलेल्या विष्ठेचे वन विभागाने संकलन करून ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविली आहे. पांढरकवडाचे डीएफओ किरण जगताप, विज्ञान डीएफओ अनंत दिघोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली.