यवतमाळ : यवतमाळ – पांढरकवडा मार्गावरील सायखेडा धरण फाट्याजवळ आज गुरूवारी सकाळी परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची भीषण टक्कर झाली. या अपघातात ट्रकमधील दोन जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत. यासोबतच ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेल्या जवळपास ३०० बकऱ्या अपघातात ठार झाल्या.
चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या ट्रक (एमएच ४०- एम २८५८) आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या घेवून निघालेला ट्रक (एमएम ४०- सीटी ५५५८) या दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील दोघेजण जागीच ठार झाले, इतर दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकमधील सुमारे ३०० बकऱ्या ठार झाल्याने रस्त्यावर मृत बकऱ्यांचा खच पडला होता. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातातील दोन्ही मृतांची ओळख पटली नव्हती.
हेही वाचा : नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी जर्मनीहून!
जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघातामुळे यवतमाळ – पांढरकवडा मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यत लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी हैद्राबाद, वणी, पांढरकवडाकडे जाणाऱ्या प्रवाशी अडकून पडले होते. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.