यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील ढाणकीपासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथे पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी दोन तरुणांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र दोन मुलींसह एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), चेतन देवानंद काळबांडे (१६), सर्व रा.सावळेश्वर, ता.उमरखेड, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.
सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोन तरुण मदतीसाठी धावले. या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा : “मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा”, वंचितची मागणी; “सरकारचा ओबीसी कोट्यावर…”
घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. प्रथमोपचारानंतर शुभमला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ढाणकी पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दुर्दैवाचा फेरा
चेतन काळबांडे यांच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतनसोबत राहत होती. चेतनच्या अशा अचानक जाण्याने कविताबाई एकाकी पडल्या आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा : अजित पवार गटात खदखद….विधान परिषदेच्या जागेवर…..
अवैध वाळू उपसा कारणीभूत असल्याचा आरोप
पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसामुळे नदीत मोठमोठाले खड्डे झाले आहेत. आंघोळीसाठी नदीत उतरणाऱ्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने आणि नदीतील खोल खड्ड्यांमध्ये अडकल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवतो. गेल्या काही काळात अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी या नदीत अशी दुर्घटना होवून तीन महीलांचा मृत्यू झाला होता. याला नदीतील अवैध वाळू उपसा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.