यवतमाळ : भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पीछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने स्थानिक संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करीत महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
येथील संविधान चौकात रखरखत्या उन्हात विविध संघटनांचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने एकत्र आले. ईव्हिएम हटाओ संविधान बचाओ, ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, वक्फ बोर्ड संशोधन विधेयक मागे घ्या, महाबोधी महाविहार मुक्त करा अशा विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे घोटाळा करून केंद्रात आणि राज्यात भाजपने सरकार स्थापन केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या प्रकाराने संसदीय लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी ईव्हिएम मशीन कायमची हद्दपार करून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. ईव्हिएम भारतातून हद्दपार हाईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत मुनेश्वर यांनी दिला. या मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई. बीएमपी पक्षाच्या उपाध्यक्ष ज्योती शामकुवर यांनी केले.
आंदोलनात शाहेद सिदिकी, विजयराज शेगेकर, विजय चहांदे, भुवन मुनेश्वर, प्रतीक भुजाडे, ॲड. रोशना आडे, अर्चना लढे, वेणूमडावी, अविनाश मरापे, दिनेश आमटे, युवराज आडे, राजीव डफाळे, विलास भोयर, गुलाब कन्नलवार आदींसह बहुजन क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांतीसेना, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मौर्य क्रांती संघ, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र टिपू सुलतान सेना, लहुजी क्रांती मोर्चा आदी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रचंड ऊन असतानाही आंदोलक रस्त्यावर ठिय्य देवून बसले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
संविधान सन्मान रॅली
समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने ॲड. सीमा तेलंगे यांच्या मार्गदर्शनात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन यवतमाळात करण्यात आले होते. पथनाट्य, देखाव्यातून संविधानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. समता मैदान येथून रॅली सुरू होवून शहरातील विविध भागात फिरली. संविधान चौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत विविध पोस्टर पथनाट्य, दृश्य सादरीकरणामधून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रॅलीत विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. चिमुकल्यांनीही विविध महापुरूषांच्या वेशभूषा साकारून समाजप्रबोधन केले.