‘स्मार्ट सिटी’कडे शहराची वाटचाल सुरू असताना शहरातील रस्ते चांगले व्हावे या दृष्टीने तीनशे कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते तयार करणार करून भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्यात आली, पण या कामासाठी आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराबाबत मात्र अजूनही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तीनशे कोटींचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनादरम्यान या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे घोषित केले. प्रशासन त्यादृष्टीने कामाला लागले होते. मात्र केंद्रीय भूपूष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी सिमेंट रस्त्यांचे येत्या १८ ऑक्टोबरला भूमिपूजन करणार असल्याचे सांगितल्यावर कंत्राटदाराचा पुढाकार, वेळेवर निधी उपलब्ध होणे आणि सल्लागारांनी वेळेवर आराखडा तयार करणे आदी प्रक्रियेमुळे सिमेंट रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.
शहरात ६७.४३ किलोमीटर ५१ सिमेंट रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून प्रशासनाने या ५१ रस्त्यांचा समावेश १२ भागांमध्ये केला. या पॅकेजच्या मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता आणि त्याला मंजुरी देण्यात आली. रस्त्यांसाठी माती परीक्षणासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याशिवाय या रस्त्यांचा आराखडा सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूटतर्फे केला जाणार असून या प्रक्रियेनंतर सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार होत्या. परंतु सर्व रस्त्यांची कामे एकाचवेळी सुरू होणे शक्य नसल्याची जाणीव अधिकाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे ५१ रस्त्यांचा समावेश १२ भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सल्लागाराची या कामासाठी निवड करण्यात येणार होती. मात्र, अजूनपर्यंत सल्लागाराचा घोळ सुटलेला नाही. दरम्यान, किमान पहिल्या भागातील कामाचे भूमिपूजन डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात यावे, असे निर्देश तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दिले असताना दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १८ ऑक्टोबरला सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहे. एकीकडे सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली असताना सल्लागार आणि कंत्राटदारांचा घोळ कायम असल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मेडिकल चौक ते अशोक चौक, दक्षिण अंबाझरी मार्ग ते रहाटे कॉलनी ते अंबाझरी टी पॉईंट, सेमिनरी हिल ते जपानी गार्डन चौक, लक्ष्मीभवन चौक ते शंकनरनगर चौक, गोळीबार चौक ते इतवारी रेल्वे स्टेशन, रेल्वे फिडर रोड नाका क्रमांक १३ ते बडकस चौक, रामेश्वरी चौक ते शताब्दी चौर रिंग रोड, विद्यापीठ ग्रंथालय ते कल्पना बिल्डींग रामदासपेठ आणि जरीपटका रोड कब्रस्तान ते कुकरेजानगर हे प्रमुख सिमेंट रस्ते तयार केले जाणार आहेत.