लोकसत्ता टीम
वर्धा: उमेद असणारे खेळाडू खूप, पण सोयीचा अभाव असल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते. महानगरात जाण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांना आयुष्याचे ध्येय गाठता येत नाही. ही उणीव दूर करण्याचा चंग महिला विकास संस्थेने बांधला आहे.
इनडोअर व आऊटडोअर अशा दोन्ही सोयी देत प्रामुख्याने देशी खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ‘ डॉ. आर. जी. भोयर स्पोर्ट्स अकादमी ‘ या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रारंभ झाला असून आज त्याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दत्ता मेघे व खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत होत आहे.
हेही वाचा… देशभरातील ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबा १४ व्या क्रमांकावर
माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांची विशेष हजेरी लागणार आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉ. मदन इंगळे म्हणाले की, या ठिकाणी होतकरू विद्यार्थ्यांना महानगरीय स्तराचे क्रीडा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करू. फिटनेस ट्रेनर व क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध राहणार असून खेळातील बारकावे शिकविले जातील. राष्ट्रीय स्तर व आपला स्तर काय, यातील भेद कळल्यास पुढील वाटचाल सोपी ठरते.