लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘एम्स’च्या शवविच्छेदन गृहासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांच्या पत्राला वैद्यकीय शिक्षण खात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे येथील मृतदेहांना शवविच्छेदनासाठी २० किलोमीटर लांब मेडिकलला न्यावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल घेत या प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून येथील शवपरीक्षण भवनाचे उद्घाटनही झाले.

एम्समध्ये दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. येथील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या दैनिक अडीच ते तीन हजारांवर गेली आहे. आता येथे अपघात व अत्यवस्थ रुग्णही मोठ्या संख्येने येतात. रुग्णालयात दाखल होणाऱ्या अपघात, पोलिसांत नोंद असलेल्यांसह वादग्रस्त मृत्यूंचे शवविच्छेदन करणे आवश्यक असते. त्यामुळे एम्स प्रशासनाकडून प्रथम नागपुरातील आरोग्य उपसंचालक व त्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याला शवविच्छेदन गृहासाठी मंजुरी मागितली. परंतु, केंद्रीय संस्थेतील शवविच्छेदन गृहाच्या मंजुरीचा अधिकार आहे का, हा तांत्रिक प्रश्न पुढे आला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनीही राज्यातील वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिवांना पत्र देत एम्समधील शवविच्छेदन गृहाला मंजुरी देण्याची विनंती केली.

आणखी वाचा-निर्वस्‍त्र छायाचित्रे प्रसारीत करण्‍याची धमकी; अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार, खंडणीही उकळली

एम्समधील रुग्णांचे शवविच्छेदन करायचे असल्यास त्यांना २० किलोमीटरवरील मेडिकलला पाठवावे लागत असल्याचेही या पत्रात सांगितले गेले. परंतु, मंजुरी नसल्याने ‘लोकसत्ता’ने हा प्रकार पुढे आणला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याने एका चमूकडून एम्सचे निरीक्षण केले. त्यापूर्वी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची सूचना केली गेली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्याच्या गृह खात्याकडे वर्ग केला गेला. आणि गृह खात्याने मंजुरी दिल्याने येथे शवविच्छेदनाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर नुकतेच एम्सला शवपरीक्षण भवनाचे उद्घाटन एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. एम. हनुमंथा राव यांच्या हस्ते झाले. यावेळी एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, विजय नायक, बी.के. अग्रवाल, डॉ. संजीव चौधरी, डॉ. गणेश डाखले उपस्थित होते.

आणखी वाचा-उत्साही कार्यकर्त्यांसोबत अजितदादांची कपडे खरेदी आणि चर्चा

‘या’ भागातील मृतदेहांचे शवविच्छेदन

एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग यांना शवविच्छेदनासाठी पोलीस ठाणे सोनेगाव, हिंगणा, एम.आय.डी.सी. (हिंगणा), बेलतरोडी, बुटीबोरी, एम. आय.डी.सी. (बुटीबोरी) आणि बेला इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करता येईल. सोबत एम्सला दगावलेल्या अपघातातील मृत्यूसह वादग्रस्त मृत्यूंचेही शवविच्छेदन करावे लागेल.