गडचिरोली : आदिवासी संघटनांनी दर्शविलेला विरोध बघता शनिवारी गोंडवाना विद्यापीठात कडेकोट पोलीस बंदोबस्तात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यापीठाबाहेर एकत्र येत विविध संघटनांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोंडवाना विद्यापीठात पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाला आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या विरोधानंतरही १९ ऑगस्टला नियोजित कार्यक्रम होईल अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजता विद्यापीठात अध्यासनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर आदिवासी युवा परिषद व बीआरएसपी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा विद्यापीठावर धडकला. यावेळी कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे यांच्यासह अधिसभा पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात अबालवृद्धांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
भाजपा, अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी
आदिवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असल्याने कार्यक्रमाला पत्रिका असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल. असे विद्यापीठ प्रशासनाकडून आदल्या दिवशी कळविण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाला भाजपा व अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली. विद्यापीठ सर्वांसाठी खुले असल्याचा दावा पत्रकातून करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने या कार्यक्रमात इतरांना डावलून भाजपा व समविचारी संघटनांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाशी पं. दीनदयाल उपाध्याय यांचा काडीचाही संबंध नाही, त्यांचे कुठले योगदान नाही, पण त्यांच्या नावाने गोंडवाना विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करून विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादण्याचा खटाटोप केला आहे. मात्र, हे कदापि खपवून घेणार नाही. विद्यापीठ आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आहे, तेथे अशा प्रकारचे छुपे अजेंडे चालणार नाहीत, यास आमचा कायम विरोध राहील.- रोहिदास राऊत, आंदोलक