नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे १५ ऑगस्ट रोजी होणारे लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहेत. महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी पर्यन्तच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १५ ऑगस्टल होईल, असे जाहीर केले होते. मात्र नंतरच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला. तो मंगळवारी झाला. मात्र अद्याप काही कामे अपूर्ण असल्याची माहिती आहे.
१५ ऑगस्टला लोकार्पण होणार का, अशी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे विचारणा केली असता अद्याप काही ठरले नाही, असे सांगण्यात येत आहे. मुंबईला विदर्भाशी जोडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती.२०१५ ला या मार्गाचे काम सुरू झाले. जवळपास ७०१ किलोमीटरचा हा मार्ग असून तो १० जिल्ह्यातून जाणार आहे. २०१९ पर्यंतच तो पूर्ण होणार होता. यापूर्वी दोन वेळा तारीख जाहीर होऊनही ऐनवेळी लोकार्पण रद्द करण्यात आले होते.