युवकांमध्ये साहित्याची गोडी विकसित व्हावी व तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा उद्या, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल येथे होणार आहे.
हेही वाचा >>>पक्षी, प्राण्यांपासून ‘ड्रोन’द्वारे पिकांचे संरक्षण; तरुण अभियंत्याचे संशोधन
लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत, तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. विभागीय आयुक्त आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. सकाळी ९.३० वाजता राष्ट्रगौरव दिंडी निघणार असून साहित्य दालन, कवीकट्टा, गझलकट्टा, वऱ्हाडीकट्टा व प्रकाशन मंचाचे उद्घाटन आ. वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते होणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि मान्यवर अतिथींचा सहभाग असणार आहे.
हेही वाचा >>>‘बार्टी’च्या निविदा प्रक्रियेत त्रुटी ; गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप
साहित्याच्या आस्वादासाठी वाचन अभिवृद्धी होणे गरजे असते. प्रथम दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमात ‘युवा पिढी सध्या काय वाचतेय?’ या परिसंवादाचे आयोजन दुपारी १ वाजता करण्यात आले आहे. यामध्ये संतोष अरसोड (यवतमाळ), नितीन नायगांवकर (नागपूर), चंद्रकांत झटाले (अकोला), अॅड. कोमल हरणे (अकोला), मैत्री नरेंद्र लांजेवार (बुलढाणा) यांचा सहभाग असणार आहे, तर परिसंवादाचे अध्यक्षपद ऐश्वर्य पाटेकर भूषवतील. त्यांनतर निमंत्रितांचे काव्यसंमेलन रंगणार असून विदर्भासह महाराष्ट्रातून आलेले निमंत्रित कवी त्यांचे काव्य सादर करतील. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विशाल इंगोले राहतील, तर सूत्रसंचालन किशोर बळी करणार आहेत. या साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे व विदर्भ साहित्य संघ आणि सहयोगी संस्थांद्वारा करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>नागपूर : रेल्वे मार्गाच्या कामासाठी १५ गाड्या चार दिवस रद्द
दालनाचे तरुणाईला आकर्षण
युवा साहित्य संमेलनाच्या विविध आकर्षणामध्ये प्रेमपत्रांचे दालन तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. कारंजा लाड येथील शिक्षक गोपाल खाडे यांना विविध वस्तु संग्रहित करण्याचा छंद असून त्यांनी विविध वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक इत्यादीमध्ये प्रकाशित प्रेमपत्रांचे संकलन केले आहे. त्यांनी जमविलेल्या प्रेमपत्रांचे प्रदर्शन संमेलनाच्या दोन्ही दिवशी आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.