देवेश गोंडाणे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपुरात आयोजित १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन चक्क हळदी-कुंकवाने करण्यात आले. उद्घाटन सत्रातील एका वक्त्यांनी घरासमोर काढण्यात आलेल्या रांगोळीमधील आकृत्या दुष्टशक्तींना घरात येण्यापासून रोखत असल्याचा जावईशोध लावून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांनाच छेद दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद देण्यात आले आहे. यातील महिला विज्ञान काँग्रेसचे संयोजन विद्यापीठ शिक्षण मंचच्या कल्पना पांडे यांच्याकडे होते. याच्या उद्घाटनादरम्यान व्यासपीठावर आलेल्या महिलांचे हळदी-कुंकू करण्यात आले. उद्घाटनाला उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां कांचन गडकरी यांनी घरासमोर रांगोळी काढा, असाही सल्ला दिला. रांगोळीतील आकृती दुष्टशक्तींना घरात येण्यापासून रोखतात, असा दावाही त्यांनी केला. विज्ञानावर कुठलेही भाष्य न करता, त्यांनी केवळ महिलांचे कर्तव्य आणि भारतीय संस्कार यावरच भाषण केले. आधीच्या काळात महिलांना आठ मुले व्हायची तरीही त्यांची प्रकृती सुदृढ राहत असे. मात्र, आताच्या महिलांना एक मूल झाले तरी त्यांना अनेक व्याधी सुरू होतात. याचे कारण म्हणजे, आधीच्या महिला या नियमित आयुर्वेदिक काढय़ाचे सेवन करीत होत्या. अध्यात्मात आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या या गोष्टी आपण विसरत चालल्याने महिलांना नवनवीन आजारांना समोर जावे लागत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी प्रास्ताविकात वैज्ञानिक गोष्टीची माहिती न देता हळदीकुंकू आणि भारतीय संस्कृती याचे कसे नाते आहे हे सांगितले. भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही विज्ञानाच्या आधारे महिलांचे सक्षमीकरण करणे ही आहे. महिला विज्ञान काँग्रेसमध्येही त्याचा अंतर्भाव असणे अपेक्षित होते. मात्र, या अवैज्ञानिक गोष्टींनी आयोजनाच्या मूळ उद्देशाला तडा दिल्याचे दिसून आले.

राईबाई पोपेरेंचा अपमान : महिला विज्ञान काँग्रेसच्या

मुख्य अतिथी पद्मश्री राईबाई पोपेरे यांचे भाषण अर्ध्यातच थांबवण्यात आले. त्या आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित अनेक गोष्टी सांगत होत्या. उद्घाटन सोहळय़ासाठी आलेल्या महिलांमध्ये त्यांच्या भाषणाबाबत आकर्षण होते. परंतु, भाषण लांबल्याचे कारण सांगून त्यांना पूर्ण बोलू न दिल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

महिला वैज्ञानिकांचा आक्षेप : परिषदेला उपस्थित राहणाऱ्या इतर महिलांचेही हळदी-कुंकू व तिळगूळ देऊन स्वागत करण्यात येत होते. याला परराज्यातून आलेल्या काही महिला वैज्ञानिकांनी विज्ञान काँग्रेसमध्ये हा कुठला प्रकार सुरू आहे, असा सवाल करत आक्षेप घेतला.