अमरावती: जिल्‍ह्यात सायबर फसवणुकीच्‍या घटना सातत्‍याने वाढत आहेत. सायबर लुटारूंकडून सर्वसामान्‍यांचीच नव्‍हे, तर उच्‍चशिक्षित लोकांचीही फसवणूक केली जात आहे. पंधरवाड्यात पाच जणांकडून तब्‍बल ७०.५८ लाख रुपये सायबर गुन्‍हेगारांनी उकळले आहेत.

शेअर बाजारात  गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून शहरातील दोन व्यक्तींची ११ लाख ६९ हजार ४०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी फसगत झालेल्या व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. सागर विनायक उंबरकर (२४, गरा. वडाळी) आणि संकेत विजय ढेंगे (४२, रा. शारदानगर, अमरावती) अशी फसवणूक झालेल्या तक्रारदारांची नावे आहेत. सागर उंबरकर यांना शेअर बाजारातून सवलतीत शेअर खरेदी करून त्यामधून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्यात येईल, असे आमिष दाखवण्‍यात आले. खात्यात रक्कम जमा झाली, हे दाखवण्यासाठी आभासी पद्धतीने खाते तयार करण्‍यात आले. मात्र प्रत्यक्षात रक्कम काढली जात नव्‍हती नव्हती. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे सागर यांना लक्षात आले. दुसरी घटना शहरातील शारदा नगरातील संकेत ढेंगे यांच्यासोबत घडली आहे.

हेही वाचा >>>ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकाराकडे छापेमारी; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

गेल्या रविवाारी कुरियरमध्ये अंमली पदार्थ आढळल्याचे सांगत कारवाईचा धाक दाखवून एका उच्‍चशिक्षित तरुणीकडून सायबर गुन्‍हेगारांनी ७ लाख ५४ हजार ९६९ रुपये उकळले होते. या घटनेने सायबर लुटारूंचे विस्‍तारलेले जाळे हुडकून काढण्‍याचे आव्‍हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

शहरातील रहिवासी एक तरुणी ही हिमाचल प्रदेशमध्ये एका कंपनीत नोकरी करीत होती. नोकरी सोडून ती घरी परतल्‍यानंतर तिला मोबाइलवर संपर्क साधण्‍यात आला. तुम्ही तैवानला पाठविलेले कुरियर परत आले आहे. त्यात अंमली पदार्थ आढळले आहेत, असे सांगून सायबर गुन्‍हेगारांनी तरुणीला कारवाईची भीती दाखवली. तिला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ७ लाख ५४ हजार ९६९ रुपये भरण्यास भाग पाडले.

काही दिवसांपुर्वी परतवाडा येथील एका तरुण उद्योजकाची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सुमित अरुणराव भुस्कडे (३१) यांनी नवीन प्रकल्‍प सुरू करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी त्यांना एका कंपनीच्या जाहिराती दिसून आल्या. प्रत्येक महिन्याला कंपनी तुम्हाला ४ लाख रुपये उत्पन्न देईल, अशी बतावणी सायबर लुटारूंनी केली. सुमित भुस्कडे यांनी आरोपींना धनादेशाद्वारे २० लाख रुपये पाठविले. मात्र, काहीच दिवसांत आरोपींनी सांगितलेल्या पत्त्यावरील कंपनीचे कार्यालय बंद आढळले.

हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या? संशय कायम

परतवाडा येथील आशिष महादेवराव बोबडे (४४) यांची देखील शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून ३१ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली होती.

त्‍यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. सायबर पोलीसही या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासात आरोपी वेगवेगळे मोबाइल वापरत असून कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सदर बँक खात्यांची साखळी जोडून प्राप्त तपशीलाच्या आधारावर छत्तीसगडमधील आरोपींना देखील करण्‍यात पोलिसांना यश आले. पण सायबर लुटारूंचे फसवणुकीचे सत्र थांबलेले नाही.