नागपूर : शहरालगत कोंढाळी गावाजवळ एका बिबट्याने माकडाला त्याची शिकार करायचे ठरवले. झाडांवर माकडांचा कळप होताच, पण खालीही काही माकड होते. त्या माकडांच्या मागे तो धावला, पण माकड त्यापेक्षाही शहाणे. ते भराभर झाडावर चढले आणि माकडाला आपली शिकार करण्याच्या नादात बिबट एका शेतातील विहीरीत पडला. हे नाट्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी वनखात्याची चमू धावली. त्याला विहीरीतून बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच त्याने विहीरीत टाकलेल्या पिंजऱ्याच्या आत जाण्याऐवजी पिंजऱ्यावर उडी घेतली. वनखात्याच्या चमूला काय होत आहे हे कळण्याआधीच या चमूतल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर त्याने उडी घेतली आणि आरडाओरडा झाल्यानंतर त्याने जंगलाकडे धूम ठोकली. बिबट्याच्या या महानाट्यातून तो कर्मचारी थोडक्यात बचावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरालगतच्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातील मेंढेपठार उपवनातील चिखली माळोदे येथील पांडुरंग खरसाडे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी, आठ जुलैला पहाटे पाच वाजताच्या सुमारास माकडाचा पाठलाग करताना बिबट विहिरीत पडला. यादरम्यान विहिरीलगतच्या आंब्याच्या झाडावर बसलेल्या माकडांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. शेतकरी पांडुरंग खरसाडे शेतावर आल्यावर माकडांचा आरडाओरडा पाहून काही तरी घडले अशी शंका त्यांना आली. शंकेचे निरसन करण्यासाठी विहिरीत डोकावून पाहिले असता, विहिरीत बिबट दिसून आला. या घटनेची माहिती वनरक्षक शीतल वाघमारे यांना देण्यात आली. वनरक्षकांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते व उपवनपरिक्षेत्र अधिकारी उमेश बनगर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.

हेही वाचा >>>‘भाईगिरी करोंगे तो ऐसेही मरोगे’… शेकडो बघ्यांसमोर तरुणास भोसकले; यवतमाळच्या दत्त चौकातील थरार

प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची योजना आखली. त्यासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूला बोलावण्यात आले. त्यानुसार बचाव पथकाच्या चमूने कारवाई सुरू केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा व इतर उपकरणे घेऊन वनखात्याची चमू तयार होती. विहीरीवर जाळी झाकली. ज्या बाजूने पिंजरा विहीरीत सोडण्यात येणार होता, त्याच्या दुसऱ्या बाजूला जाळीचा जोड दिला आणि मग पिंजरा विहीरीत सोडला. बिबट विहीरीच्या दरीत लपला होता. बचाव पथक बांबूच्या सहाय्याने तो बिबट पिंजऱ्यात जावा यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, बिबट्याने पिंजऱ्यात जाण्याऐवजी पिंजऱ्याच्या जाळीला पायाने पकडून पिंजऱ्याच्या वर चढत बाहेर झेप घेतली. त्याचवेळी जमावाने आरडाओरडा करताच बिबट परतला आणि एका वनकर्मचाऱ्यावर झेप घेतली व आरडाओरडा होताच पुन्हा त्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incident in nagpur a leopard ran after a hunter and fell into a well rgc 76 amy
Show comments