वर्धा : घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील हिंगणीलगत देवनगर परिसरात हा खून झाला. सतत मनात धुमसणाऱ्या रागाचा भडका केव्हाही उडू शकतो, याचे प्रत्यंतर देणारी ही घटना होय.
देवनगरात राहणाऱ्या तराळे कुटुंबातील मोठा भाऊ रवींद्र बंडुजी तराळे व लहान भाऊ अमोल बंडुजी तराळे यांच्यात वाद सुरू होता. दोघेही भाऊ आईवडिलांसोबत एकाच घरात राहत होते. सातत्याने काही कारणास्तव हे दोघे भाऊ नेहमी भांडायचे. वाद नेहमी विकोपाला जात असे. त्याचा राग ठेवून लहान भाऊ अमोलने उट्टे काढायचे ठरवले.
हेही वाचा – गोंदिया : दोन बाजार समित्यांसाठी भर पावसात मतदान सुरू
घटनेच्या दिवशी रवींद्र घरी झोपून होता. ही संधी साधून अमोलने रवींद्रच्या मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार केले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटना उजेडात आल्यानंतर गावात चांगलीच खळबळ उडून गर्दी जमा झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. एक मुलगा यमसदनी तर दुसरा पोलीस कोठडीत पोहचल्याने आई वडिलांची स्थिती अनाथ असल्यासारखी झाल्याची भावना गावकरी व्यक्त करीत आहे.