राजेश्वर ठाकरे
नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी आणि त्यांच्या वस्तू सुरक्षित नसल्याचे रेल्वेत होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या आकेडवारीवरून दिसून येते . तीन वर्षांत धावत्या रेल्वेत चोरीच्या घटनांमध्ये तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वेगाड्यांची आणि रेल्वे सुरक्षा दलातील जवानांची संख्या वाढताना दिसत नाही. त्याचा परिणाम रेल्वेच्या आरक्षित डब्यात प्रवाशांच्या वस्तू चोरी होण्याचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. २०२१ मध्ये ६८२ चोरीच्या घटना घडल्या होत्या. पुढल्या वर्षी ११६० घटना घडल्या आणि ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १३२४ चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे, असा तपशील माहिती अधिकारात अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे.
नागपूरमार्गे धावणारी पुणे ते हटिया एक्सप्रेसमध्ये अलीकडे तृतीयपंथीयांनी रात्री प्रवाशांना लुटण्याची घटना घडली. त्याबाबत भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत या केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले, रेल्वेत तिकीट तपासणींची पदे रिक्त आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर विभागातील दोन हजार पदे रिक्त आहेत. रेल्वेगाडी २१ ते २५ डब्यांची असते. साधारणत: एका टीटीई तीन-चार डब्यांमध्ये तिकीट तपासणी करीत असतात. पण, टीटीईची पदे रिक्त असल्याने एकेका टीटीईला १० ते ११ डबे तपासण्यास सांगण्यात येते. हे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक डब्यांपर्यंत टीटीई पोहचू शकत नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या कमी असल्याने धावत्या गाडीत प्रत्येक डब्यात गस्त घातली जात नाही. तसेच शयनयान डब्यांमध्ये सर्वसाधारण डब्यांप्रमाणे प्रवासी बसवले जात आहेत. त्याचा परिणाम चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. टीटीई किंवा आरपीएफ जवान पुरेसे उपलब्ध करण्याचे रेल्वेचे धोरण रेल्वे प्रवाशांच्या असुरक्षितेचे कारण ठरत आहे, असे शुक्ला म्हणाले.
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय परिसरात अपघात पीडितांचा ‘राम नाम जप’, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…
११ कोटींपेक्षा जास्त ऐवज पळवला
१ जानेवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रेल्वेत ३,१६६ चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २०२१ मध्ये ६८२ चोरीच्या घटना घडल्या आणि त्यात १ कोटी ७२ लाख ४७ हजार ५२२ रुपयांचा ऐवज चोरीस गेला. २०२२ मध्ये ११६० घटनांची नोंद झाली आणि त्यात ४ कोटी ५० लाख ९३ हजार ३०५ रुपयांचा ऐवज लंपास केला. तर ऑक्टोबर २०२३ पर्यंत १३२४ चोरीच्या घटनांमधून ४ कोटी ८५ लाख ५५ हजार ८५८ ऐवज चोरीस गेला. साडेतीन वर्षात रेल्वेतील चोरीच्या घटनांमध्ये प्रवाशांचा ११,०८,९६,६८५ रुपयांचा ऐवजी लंपास केला गेला.